खोपोलीत सांस्कृतिक वारसाकडे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत सांस्कृतिक वारसाकडे दुर्लक्ष
खोपोलीत सांस्कृतिक वारसाकडे दुर्लक्ष

खोपोलीत सांस्कृतिक वारसाकडे दुर्लक्ष

sakal_logo
By

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा
खोपोली, ता. १८ ः छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह व नाट्यगृह संकुल खोपोलीचे वैभव व शहराचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सतत तीन वर्षे हे सभागृह बंद असून सद्यस्थितीत सभागृहाची स्थिती बिकट आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या अनास्‍थेमुळे संकुल अडगळीत गेले आहे. दरम्यान ज्‍येष्ठ नेते व हौशी नाट्यकर्मी उल्हासराव देशमुख, दिग्दर्शक प्रवीण पुरी, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठेलकर यांनी पुढाकाराने नाट्यगृह बचाव मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
शहरातील नाट्यकर्मी व नाट्यरसिक सभागृह कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आहे. सध्या सभागृहाच्या मैदानात लहान मुले क्रिकेट खेळत असून, शहरातील बेघरांचे हक्काचे निवासस्थान बनले आहे. नाट्यगृह परिसरात दारूच्या बाटल्या पडलेल्‍या दिसतात.
लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यावर पालिकेचा प्रशासकीय कारभार मुख्याधिकारी अनुप दुरे -पाटील यांच्या हातात आहे. राजकीय विरोध किंवा कोणताही अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता नसल्‍याने नाट्यगृहाची डागडुजी व आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जवळपास १५ कोटींहून अधिक निधी खर्च झालेल्या सभागृहाचे उद्‌घाटन सहा वर्षांपूर्वी राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सभागृह निर्मितीनंतर विविध कार्यक्रमांनी खोपोलीकरांचे मन रिजवले, मात्र सभागृह चालविण्यासाठी नियुक्त ठेकेदार व पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्‍यामुळे नाट्यगृहाची दैनावस्‍था झाली आहे.
नाट्यगृह सुस्थितीत होऊन नियमितपणे सुरू होण्यासाठी खोपोलीतील ज्येष्ठ रंगकर्मी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उल्हासराव देशमुख, हौशी नाट्यकर्मी प्रवीण क्षीरसागर, संतोष कोळपकर, नाट्य दिग्‍दर्शक प्रवीण पुरी व नाट्यप्रेमी निशा दळवी, प्रकाश राजोपाध्ये, नितीन भावे, गुरुनाथ साठेलकर असे अनेकजण पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी उल्हासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ स्तरावर निवेदनही दिले आहेत.

तातडीने आवश्यक डागडुजी व दुरुस्ती करून नाट्यगृह व सामाजिक सभागृह सुरू होण्याची गरज आहे. त्यासाठी पालिका प्रशासनापासून, जिल्हाधिकारी, पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास लोक आंदोलन करण्यात येईल.
- उल्हासराव देशमुख, ज्‍येष्ठ नेते/हौशी रंगकर्मी

शहराचे वैभव असलेल्या वास्तूची डोळ्यादेखत दुरवस्था होत असल्याने दुःख होत आहे. आवश्यक दुरुस्ती व डागडुजीसाठी निधी मंजूर असल्याचे समजते. पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नाट्यगृह सुस्‍थितीत करावे.
- गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते

नाट्यगृहाची दुरुस्ती-डागडुजीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. यासाठी मोठा निधी लागणार असल्याने, प्रशासकीय मंजुरीसाठी सविस्तर प्रस्तावही तयार करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. खर्चाची तरतूद करून त्यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि लवकरात लवकर कामाला सुरुवात केली जाणार आहे.
- अनुप दुरे-पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

खोपोली : छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह व सभागृहाची दैनावस्‍था झाली आहे.