द्रुतगती मार्गावरील तीन अपघातांत दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती मार्गावरील तीन अपघातांत दोघांचा मृत्यू
द्रुतगती मार्गावरील तीन अपघातांत दोघांचा मृत्यू

द्रुतगती मार्गावरील तीन अपघातांत दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

खोपोली, ता. ५ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व खंडाळा घाट परिसरात अपघातांची मालिका चालूच आहे. रविवारी (ता. ४) रात्री उशिरा झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू व एकूण सहा जण जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किमी ३६ परिसरात आडोशी उतारावर जीप उलटून अपघात घडला. सदरच्या अपघातात गाडी डाव्या बाजूला रेलिंगला धडकल्यामुळे पलटी झाली. या अपघातात चालक विजय मंगल पाटील (वय ५७, रा. कांजूरमार्ग, मुंबई) हे मयत झाले असून त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी असे जखमी झाले आहेत. दुसरा अपघात पुण्याहून बदलापूरकडे निघालेला मालवाहू टेम्पो बोरघाटातून मेकॅनिक पॉइंटजवळ आला असता चालक शाहरूख कुरेशी (वय २८, रा. खडकी बाजार, पुणे) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला. तीव्र वळणावर रस्त्यालगतचा असलेला सुरक्षा कठडा तोडून टेम्पो ३० फूट खोल दरीत कोसळला. त्या ठिकाणी असलेल्या झाडांमुळे टेम्पो अडकला. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. टेम्पोचालकासह प्रवास करणारा अबुबकर कुरेशी (वय ३२, रा. खडकी बाजार, पुणे) आणि वर्जेनिया फिलिप टाकार (वय ५३, रा. हिंजवडी, पुणे) हे तिघेही जखमी अवस्थेत अडकले होते. महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी त्यांना टेम्पोमधून बाहेर काढून तातडीने उपचारार्थ खोपोली नगरपालिका रुग्णालयामध्ये हलवले.

पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किलोमीटर ३४.५०० च्या दरम्यान पुणे मार्गिकेवर एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या अनोळखीचा मृत्यू झाला. आय.आर.बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी मृतदेह पुढील शासकीय प्रक्रियेसाठी खालापूर शासकीय रुग्णालयात दाखल नेला. याबाबत खोपोली पोलिस पुढील तपास करत आहेत.