खोपोलीत आरोग्‍य सुविधांची वानवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत आरोग्‍य सुविधांची वानवा
खोपोलीत आरोग्‍य सुविधांची वानवा

खोपोलीत आरोग्‍य सुविधांची वानवा

sakal_logo
By

खोपोली, ता. १२ (बातमीदार) ः सहलीसाठी गेलेल्‍या चेंबूर येथील मयांग ‌ट्युटोरिअल्‍स या खासगी शिकवणीच्या बसला रविवारी रात्री आठच्या सुमारास द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. बोरघाटातील अंडा पॉईंटच्या तीव्र वळणावर बस उलटल्‍याने ३५ विद्यार्थी जखमी झाले तर दोघांचा मृत्‍यू झाला. यातील सहा विद्यार्थी गंभीर असून त्यांच्यावर एमजीएम व अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर खोपोलीत विशेषतः महामार्गालगत एकही अद्ययावत रुग्‍णालय नसल्‍याने अपघातग्रस्‍तांना वेळीच उपचार मिळण्यात अडचणी येत असल्‍याचे पुन्हा एकदा समोर आला आहे.
अपघात झाल्यावर जखमी विद्यार्थ्यांना खोपोलीतील नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व शहरातील अन्य खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. आंबेडकर रुग्णालयात मनुष्‍यबळाचा अभाव दिसून आला. याशिवाय उपचाराससाठी आवश्‍यक साधनसामग्रीचाही तुटवडा जाणवला.
शहरात एकाच वेळी वीसपेक्षा अधिक गंभीर जखमींवर उपचार होतील, असे एकही खासगी रुग्‍णालयही नाही. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्‍थाही तशीच आहे. पालिका रुग्णालय व खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधांपासून एक्स रे मशीन, सिटीस्‍कॅन, एमआरएमची सुविधा नाहीत.
द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्गावर दररोज होणारे अपघात याशिवाय औद्योगिक क्षेत्रात वारंवार निर्माण होणाऱ्या आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी खोपोलीत अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त आरोग्य सेवा उपलब्ध होण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र त्‍याकडे दुर्लक्ष होत असल्‍याने उपचाराअभावी अनेकांचे बळी गेले आहेत.

रुग्‍णालयाचा प्रस्‍ताव मंजूर; तरीही कामात दिरंगाई
खोपोली परिसरात परिसरात अत्याधुनिक रुग्‍णालय व्हावे, यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सामाजिक संस्था शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत. एक वर्षापूर्वी पाली फाटा येथे शंभर खाटांच्या रुग्णालयाला आरोग्य विभाग व प्रशासनाने मंजुरीही दिली आहे. मात्र अद्यापही मात्र प्रस्तावित रुग्णालयाच्या निर्मितीला सुरुवात झाली नसल्‍याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

वाढत्या नागरीकरणासाठी आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने माजी आमदार सुरेश लाड यांनी पाठपुरावा केल्यावर तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी द्रुतगती मार्गाला लागून देवन्हावे ग्रामपंचायत हद्दीत सर्व सुविधांयुक्त ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. राज्याचे तत्‍कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून रुग्णालय आराखडा व निधी मंजूर करण्यात आला. यासाठी जागा व अन्य तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावरही रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे, शिवाय त्‍या मागचे कारणही समजू शकलेले नाही.
- नरेश पाटील, माजी आरोग्य सभापती, रायगड

खोपोली नगरपालिका रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णावर उपचारासाठी यंत्रसामग्री, आवश्यक सुविधा व तांत्रिक बाबी उपलब्ध नसल्याने मर्यादा येतात. त्यामुळे नाईलाजाने रुग्णांना पनवेल, नवी मुंबई येथील रुग्णालयात हलवावे लागते.
- डॉ. संगीता वानखेडे, आरोग्य अधिकारी, खोपोली

खोपोली : जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

(छायाचित्रे : अनिल पाटील )