महावीर उद्यानाचे वैभव हरपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावीर उद्यानाचे वैभव हरपले
महावीर उद्यानाचे वैभव हरपले

महावीर उद्यानाचे वैभव हरपले

sakal_logo
By

खोपोली, ता.२५ (बातमीदार) ः नगरपालिकेचे शास्त्रीनगर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगवान महावीर उद्यानाचे वैभव हरवल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. २०१६ मध्ये ४२ लाख रुपयांचा निधी खर्च करून उद्यानाचे विस्तारीकरण व नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर दर दोन वर्षांनी उद्यानावर नगरपालिकेकडून जवळपास १२ ते १५ लाखांचा निधी खर्च केला जात आहे. एका बाजूला नियमित खर्च होऊनही उद्यानाची स्थिती मात्र सुधारण्याऐवजी बिघडत आहे. दोन वर्षे कोरोनाचे कारण पुढे करून उद्यानाच्या देखभाल व डागडुजीकडे दुर्लक्ष झाले आहे.
महावीर उद्यानात बसविण्यात आलेली खेळणी ज्यात मिनी ट्रेन, लहान मुलांसाठीचे विविध खेळणे, पाळणे व अन्य साहित्य सामग्री बंद पडली आहे किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. येथील हिरवाईला वेळेवर पाणी मिळत नसल्याने गवत सुकले आहे. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले कारंजे व अन्य शोभेचे साहित्यही देखभाल-दुरुस्‍तीअभावी नादुरुस्‍त झाले आहे.
एकेकाळी बच्चे कंपनी व थोरामोठ्यांच्या विरंगुळ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या महावीर उद्यानातील सोयीसुविधा नष्ट होत आहेत. महावीर उद्यानाची सध्याची स्‍थिती पाहता, उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आलेला लाखोंचा निधी वाया गेल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे.


व्यापारी संघटना आक्रमक
कोरोना संकट, त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे महावीर उद्यानाचे नुकसान झाल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर उद्यानातील महागडी खेळणी व अन्य साहित्याची झालेली मोडतोड व नुकसान निव्वळ नगरपालिकाच्या दुर्लक्षामुळे झाल्‍याचे स्‍थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींचे म्‍हणणे आहे. दरम्‍यान उद्यानाच्या दुरवस्थेमुळे खोपोली जैन संघटना व व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली असून लवकरात लवकर उद्यानाला गतवैभव प्राप्त होण्याची करून देण्याची मागणी खोपोली जैन समाज संघटनेकडून नगरपालिकेकडे करण्यात येणार आहे.

उद्यान देखभाल व डागडुजीसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. आवश्यक निधीही उपलब्ध आहे. यासंदर्भात अहवाल बनविण्यात येत आहे. आगामी काळात महावीर उद्यान व शहरातील अन्य उद्यानांतील त्रुटी दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.
- अनुप दुरे, मुख्याधिकारी, खोपोली

खोपोली ः भगवान महावीर उद्यानाची दुरवस्‍था झाली आहे.