
खोपोलीत सांस्कृतिक वारसाकडे दुर्लक्ष
खोपोली, ता. २ (बातमीदार) ः छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह व नाट्यगृह संकुल खोपोलीचे वैभव व शहराचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे . मात्र सद्यःस्थितीत सभागृहाची दुरवस्था झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तीन वर्षे सभागृह बंद असून मोडकळीस आले आहे. नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे नाट्यगृह पुन्हा सुरू होईल की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यानच्या काळात ज्येष्ठ नेते व हौशी नाट्यकर्मी उल्हासराव देशमुख, दिग्दर्शक प्रवीण पुरी, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठेलकर, नितीन भावे, निशा दळवी व अन्य नाट्यप्रेमीच्या पुढाकाराने नाट्यगृह बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार व पालकमंत्री तसेच राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे नाट्यगृह पूर्ववत सुरू होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नाट्य रसिकांमध्ये नाराजी आहे.
खोपोली नगरपालिकेकडून याठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त केला असला तरी मैदानात मुले क्रिकेट खेळतात. तर रात्रीच्या वेळी अनेकदा गैरप्रकार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नाट्यगृहातील अनेक किमती साहित्य गायब होत असून काही तुटले आहे. लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने दीड वर्षांपासून पालिकेचा प्रशासकीय कारभार मुख्याधिकारी अनुप दुरे-पाटील यांच्या हातात आहे. त्यांनी तातडीने नाट्यगृहाची डागडुजी व आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नाट्यकर्मी व सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जवळपास १५ कोटींहून अधिक निधी खर्चून सात वर्षांपूर्वी सभागृहाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सभागृह निर्मितीनंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी झाले. मात्र सभागृह चालविण्यासाठी पालिकाकडून नियुक्त ठेकेदार व पालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे नाट्यगृहाची दयनीय अवस्था झाली आहे.
तातडीने डागडुजी व दुरुस्ती करून नाट्यगृह व सामाजिक सभागृह सुरू होण्याची गरज आहे. त्यासाठी पालिका प्रशासनापासून, जिल्हाधिकारी, पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
- उल्हासराव देशमुख , ज्येष्ठ नेते व हौशी रंगकर्मी खोपोली
शहराचे वैभव असलेल्या वास्तूची डोळ्यादेखत दुरवस्था होत असल्याने खंत वाटते. आवश्यक दुरुस्ती व डागडुजीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे मध्यंतरी प्रशासनाकडून सांगण्यात आले, त्यामुळे लवकरात लवकर काम होणे अपेक्षित आहे.
- गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते, खोपोली
दुरुस्ती व डागडुजी बाबतीत सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. यासाठी मोठा निधी लागणार असल्याने, प्रशासकीय मंजुरीसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यास तातडीने काम सुरू करण्यात येईल.
- अनुप दुरे-पाटील, मुख्याधिकारी, खोपोली
खोपोली : छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह, सभागृहाची दुरवस्था झाली आहे.