आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ‘आपदा मित्र’ सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ‘आपदा मित्र’ सज्ज
आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ‘आपदा मित्र’ सज्ज

आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ‘आपदा मित्र’ सज्ज

sakal_logo
By

खोपोली, ता. १५ (बातमीदार) ः राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रायगड जिल्‍ह्यात आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यात खालापूर, खोपोली, चौक, माथेरान आणि कर्जतमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी १२ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
कर्जतचे प्रांताधिकारी अजित नेराळे, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सागर पाठक, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आपदा मित्र आणि आपदा सखी’ प्रशिक्षण कार्यक्रमाला २७ फेब्रुवारीपासून खोपोलीतील याक एज्यूकेशन इन्स्टिट्यूटच्या सभागृहातून सुरुवात झाली. यात रायगड नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कालावधीत अभ्यास वर्गातून भौतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष फील्डवर नेऊन प्रशिक्षणार्थींना आपत्कालीन प्रसंगात कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. आपत्काळात जीवित आणि वित्त हानी रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची विस्तृत माहिती देण्यात आली.
आपदा मित्र आणि सखींसाठी प्रशिक्षण काळात मॉकड्रिल आणि चाचचीही घेण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक आपदा मित्र आणि आपदा सखीला संकट समयी आवश्यक असलेले साहित्यही दिले गेले. त्याचप्रमाणे पाच लाखांचा वैद्यकीय विमा, प्रमाणपत्र व ओळखपत्रही दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा समारोप तहसीलदार आयूब तांबोळी, खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार, खालापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आसावरी पाटील यांच्या उपस्थित पार पडला. प्रशिक्षित आपदा मित्र आणि सखी दोन्ही तालुक्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्हासाठी संकटमोचन ठरतील, असा विश्वास तांबोळी व अन्य मान्यवरांनी व्यक्त केला.
प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी याक एज्युकेशन इन्स्टिट्यूट, अल्टा लायब्रोटरिज, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, खत्री फार्म - कलोते, कॅम्प मॅक्स - कलोते, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाची देवदूत यंत्रणा, टाटा स्टील कंपनीची अग्‍निशमन विभाग आदी संस्थांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षणात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, सह्याद्री ट्रेकर्स - माथेरान, ताराराणी ब्रिगेड यशवंती हायकर्स, आयआरबी, टाटा स्टील, परिसरातील विविध कंपन्या व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

खोपोली : आपदा प्रशिक्षण सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.