
खोपोलीत आपचे बेमुदत उपोषण
खोपोली, ता. २६ (बातमीदार) : खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी गौतम भगळे व कार्यालयीन अधीक्षक मीनल जाधव यांच्यावर उर्मट, उद्घट व असभ्य भाषा वापरण्याचा आरोप होत आहे. या दोघांच्या निलंबनाच्या कारवाईसाठी आपकडून आंदोलन सुरू झाले आहे.
या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्यासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर आप खोपोली-खालापूरच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
बुधवारी उपोषण आंदोलनाचा दुसरा दिवस होता. मुख्याधिकारी अनुप दुरे व तहसीलदार आयुब तांबोळी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन काहीतरी मार्ग काढतील, अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये आहे. तालुकाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, रायगड जिल्हा मुख्य समनव्यक डॉ. रियाज पठाण, खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आंदोलन सुरू आहे. खोपोली शहर काँग्रेस व अन्य समविचारी राजकीय पक्ष नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.