खोपोलीत मान्सूनपूर्व कामांना अद्याप मुहूर्त मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत मान्सूनपूर्व कामांना अद्याप मुहूर्त मिळेना
खोपोलीत मान्सूनपूर्व कामांना अद्याप मुहूर्त मिळेना

खोपोलीत मान्सूनपूर्व कामांना अद्याप मुहूर्त मिळेना

sakal_logo
By

खोपोली, ता. ४ (बातमीदार) ः दरवर्षी खोपोली नगरपालिकाकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने शहरात नालेसफाई, झाडांची छाटणी आदी मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली जाते. या वर्षी मात्र कोणत्याच प्रभागात मान्सूनपूर्व कामे सुरू न झाल्‍याने नागरिकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.
पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती, रहिवासी भागात पाणी साचून नुकसान टाळण्यासाठी नाले व गटारांची साफसफाई आवश्यक आहे. मे महिना सुरू होताच ही कामे हाती घेतली जातात, मात्र शहरात अद्याप कामे सुरूच न झाल्‍याने ती वेळेत पूर्ण होण्याबाबतही साशंकता व्यक्‍त होत आहे. दीड वर्षांहून अधिक काळापासून खोपोली पालिकेतील लोकप्रतिनिधीची मुदत संपल्याने संपूर्ण कारभार प्रशासनाकडे आहे. मुख्याधिकारी अनुप दुरे हेच सध्या प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. लोकप्रतिनिधीकडून प्रभागातील समस्‍या, अडचणींवर आवाज उठवला जात नसल्‍याने दिवसेंदिवस मूलभूत समस्‍याही वाढत आहेत. तसेच मान्सूनपूर्व कामांचा निपटारा करण्याकडेही दुर्लक्ष होत असल्‍याचे नगरपालिकेचे कर्मचारी खासगीत बोलतात.
खोपोली शहरातील सर्व प्रमुख नाले व विविध रहिवासी भागातील गटारे गवत, झाडीझुडुपे, कचरा, गाळ, प्लास्टिक पिशव्यांनी भरले आहेत. पावसाळ्यापूर्वी त्‍यांची साफसफाई न झाल्‍यास पाणी निचरा होण्यास अडसर निर्माण होण्याची तसेच रहिवासी भागात पाणी भरण्याची भीती व्यक्‍त होत आहे. तसेच दरडग्रस्त डोंगर व त्या खालील रहिवासी भागाची पाहणी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही दरवर्षी केल्या जातात. याही संदर्भात नगरपालिकेकडून कार्यवाही होत नसल्‍याने नागरिक व आजी माजी नगरसेवक नाराजी व्यक्त करत आहेत.
सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. अशात नालेसफाई व अन्य मान्सूनपूर्व कामे रखडल्यास याचा परिणाम पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.

खोपोली : शहरातील नालेसफाईची आवश्‍यकता आहे.