द्रुतगती मार्गावर सात वाहनांचा भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती मार्गावर सात वाहनांचा भीषण अपघात
द्रुतगती मार्गावर सात वाहनांचा भीषण अपघात

द्रुतगती मार्गावर सात वाहनांचा भीषण अपघात

sakal_logo
By

खोपोली, ता. २३ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर आडोशी उतारावर एक ट्रक अनियंत्रित झाल्यानंतर सात वाहनांचा भीषण अपघात घडला. यात पाच कार, एक ट्रक व एका टेम्पोचा समावेश आहे. कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात सुभाष पंढरीनाथ चौगुले (वय ४५) राहणार वाशी, नवी मुंबई यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. अपघातात कार व अन्य वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातातील पाचही जखमींना तातडीने खोपोली नगरपालिका रुग्णालयात व नंतर एमजीएम रुग्णालय कामोठे व वाशी येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातातील जखमींमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. सर्वांना गंभीर दुखापत झाली असल्याने सर्वांची स्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महामार्गावरील यंत्रणा, खोपोली पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान या अपघातासाठी मदतकार्य सुरू असतानाच खालापूर टोल नाका येथे एक कार पुढील वाहनास धडकून दुसरा अपघात झाला. यात दोन जण किरकोळ जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले.

अपघातातील जखमी
चंद्रकला सुभाष चौगुले (वय ४३, रा. वाशी), अमित कुमार श्रीहरिराम थठेर (वय ३०), कौसर अली शाह (वय ४०), आफताब समीउल्ला आलम (वय १९, तिघेही रा. भांडुप), अफसर अली मोहम्मद अली (वय ३६, रा. वडाळा) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.