खोपोलीत स्वच्छता फक्त कागदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत स्वच्छता फक्त कागदावर
खोपोलीत स्वच्छता फक्त कागदावर

खोपोलीत स्वच्छता फक्त कागदावर

sakal_logo
By

खोपोलीतील स्वच्छता फक्त कागदावर
नालेसफाईकडे दुर्लक्ष; गटारात कचऱ्याचे ढीग

खोपोली, ता. २३ (बातमीदार) ः स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत खोपोली नगरपालिकेकडून शहरातील भिंती रंगवून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला आहे, मात्र शहरातील गटारे, नालेसफाईकडे दुर्लक्ष होत असल्‍याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पालिका क्षेत्रातील अनेक गटारे, नाले कचरा, गाळ, प्लास्टिकमुळे तुंबले आहेत. सांडपाणी निचरा होत नसल्याने दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
एकीकडे स्वच्छता अभियानांतर्गत लाखोंचा निधी खर्च होत आहे तर दुसरीकडे नागरिकांच्या किमान मूलभूत गरजा व सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रहिवासी सोसायट्या, बैठ्या वसाहती, सार्वजनिक गटारे व नैसर्गिक नाल्यांची स्थिती दयनीय आहे. गवत, कचरा व प्लास्टिक बाटल्यांनी गटारे तुंबली आहेत, तर काही गटारे मोडकळीस आल्‍याने सांडपाणी रस्‍त्‍यावर येत आहे. त्‍यांची साफसफाई, दुरुस्‍ती होणे गरजेचे असताना, पालिका प्रशासन मात्र स्‍वच्छता संदेश व भिंती रंगवण्यात दंग असल्‍याने नागरिकांकडून संताप व्यक्‍त होत आहे.

खोपोली शहरात टप्प्याटप्प्याने पावसाळापूर्व गटारे व नालेसफाईची कामे होत आहेत. यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून दोन वरिष्ठ अधिकारी नेमण्यात आले आहेत.
- अनुप दुरे-पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

शहरातील गटारे महिनोंमहिने साफ केली जात नाही. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा साचला आहे. वीज महावितरणकडून तोडण्यात आलेली झाडांच्या फांद्या महिना झाला तरी तशाच गटारांवर पडल्‍या आहेत.
- सुहास सेलूकर, रहिवासी खोपोली

खोपोली : सफाईअभावी शहरातील नाले, गटारे तुंबले आहेत.

..................

पालीत नालेसफाईला सुरुवात
पाली, ता. २३ (वार्ताहर) ः अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये नगरपंचायततर्फे नालेसफाईला सुरुवात झाली आहे. पाण्याच्या बाटल्‍या, प्लास्टिक पिशव्या, घरगुती कचरा व गाळामुळे शहरात ठिकठिकाणी नाले, गटारे तुंबली होती. त्‍यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. मात्र नालेसफाईला सुरुवात झाल्याने या सर्व समस्या मार्गी लागणार आहेत.
नगरपंचायतीद्वारे कंत्राटी कामगारांच्या मदतीने जेसीबी, ट्रॅक्टर व पारंपरिक साधनांचा वापर करून नालेसफाई केली जात आहे. याबरोबरच नाल्याभोवती वाढलेले गवत, झाडे-झुडपेही तोडण्यात येत आहेत.
नालेसफाईची कामे मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण पूर्ण होतील. स्वच्छता सभापती व नगरसेवक या कामांवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी प्लास्टिक बॉटल, पिशव्या व घरातील कचरा गटारे अथवा नाल्‍यांत टाकू नये, असे आवाहन नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांनी केले आहेत.

पाली ः नालीसफाईची सुरू असलेली कामे करण्यात आली आहेत. (छायाचित्र, अमित गवळे)

...................