
खोपोलीत ‘स्लो सायकल’ स्पर्धा
खोपोली, ता. ३० (बातमीदार) ः सध्या सर्वत्र पुढे जाण्याची धूम असताना शांतपणे मागे राहूनही आपण जिंकू शकतो व ताणतणाव कमी करून आनंदी आयुष्य जगू शकतो, असा संदेश देण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने पंत पाटणकर क्रीडांगणात नुकतेच ‘स्लो सायकल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक धर्मराज पाटील, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती बिवरे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हर्डीकर व डॉ.रियाज पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. १५ वर्षांवरील खुल्या गटात प्रथम क्रमांक अयान शेख, द्वितीय महेश यादव , तृतीय क्रमांक संकेत कुंभार यांनी पटकावला. त्यांना रोख पारितोषिक व चषक देवून गौरविण्यात आले. तर १५ वर्षांखालील स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम राक्षे व द्वितीय आहिल लोगडे यांना चषक देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्ह्यातून एकाच व्यक्तीने ३ पेटंट मिळविणे या पराक्रमासाठी खोपोलीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते धर्मराज पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.