
महाड-शिरगाव रस्त्याचे काम कूर्मगतीने
महाड, ता. ४ (बातमीदार)ः दापोली, मंडणगड व खेड या तालुक्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील महाड-शिरगावदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम कूर्मगतीने सुरू आहे. अवघ्या दीड किमीच्या रस्त्याचे काम तीन महिन्यांचा कालवधी लोटूनही अद्याप पूर्ण होत नसल्याने स्थानिक, वाहनचालक व प्रवासी मेटाकुटीस आले आहेत.
महाड शहरातून विन्हेरे तुळशीखिंडमार्गे खेड तसेच दापोली, मंडणगड, म्हाप्रळकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. याच रस्त्यावर दादली-शिरगाव ही गावे जोडली जातात. सध्या महाड-मंडणगड, म्हाप्रळ-आंबडवे गावला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू आहे. यातील एक टप्प्यादरम्यान महाड-दादली-शिरगाव रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. याकरिता मूळ डांबरी रस्ता पूर्णपणे उखडण्यात आला आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले होते.
शिरगाव-दादली अंतर जेमतेम दीड किमी असून महाड शहरालगत असल्याने कायम वर्दळ असते. आंबेत पूल बंद असल्याने दापोली, मंडणगड, म्हाप्रळकडे जाणारी सर्व वाहतूक या मार्गावरून होत आहे; तर मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने खेडकडे जाणारी वाहनेदेखील याच मार्गाने जातात.
वाहतूक वाढल्याने त्यातच रस्त्याचे काम सुरू असताना, पक्का पर्यायी मार्ग न केल्याने कोंडी होत असून स्थानिक वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. कामामुळे दादली आणि शिरगावातील स्थानिकांना धुळीचा सामना करावा लागतो.
पर्यटक, चाकरमानी हैराण
महाड-शिरगावदरम्यानचा मार्ग वर्दळीचा आहे. सुट्टी असल्याने दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटक, चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याचे काम सुरू करताना वाहतूक कोंडीचा विचार केला गेला नाही. पर्यायी डांबरी रस्ता किंवा मुख्य काँक्रीट रस्त्यालगत साईडपट्टी, डांबरीकरण करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता न करताच काम सुरू केल्याने चालकांना त्रास सहन करावा लागतो.
महाड-शिरगावदरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे; मात्र मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- अविनाश बोर्ले, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड
रस्त्याच्या कामामुळे वाहने संथगतीने चालवावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. रस्ते उखडल्याने धूळ उडत असून यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही.
- प्रशांत शेलार, प्रवासी
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07654 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..