
महाडमध्ये रंगला हरिपाठ महोत्सव
महाड, ता. ४ (बातमीदार) : लोकविकास सामाजिक संस्थेच्या वतीने हरिपाठ महोत्सवात महाड तालुक्यातील कसबे शिवथर येथील बाल भजनी मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. महाडच्या श्री वीरेश्वर मंदिराच्या प्रांगणात २९ व ३० एप्रिल या दोन दिवस रंगलेल्या हरिपाठ महोत्सवांमध्ये १५ हरिपाठ मंडळे सहभागी झाली होती. या वर्षी हा महोत्सव महाड, पोलादपूर व माणगाव या तीन तालुक्यांपुरता मर्यादित ठेवण्यात आला होता. परंतु या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहून हरिपाठ महोत्सवाची व्याप्ती पुढील वर्षी वाढवली जाईल, अशी घोषणा प्रदेश काँग्रेसच्या सचिव स्नेहल जगताप यांनी यावेळी केली.
वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला मोठे महत्त्व दिले जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ अशा अनेक संतांनी हरिपाठाचे अभंग रचले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये हे हरिपाठाचे अभंग गायले जातात. असेच अनेक अभंग या महोत्सवामध्ये सादर करण्यात आले. कसबे शिवथर येथील बाल भजनी मंडळाने या महोत्सवात प्रथम क्रमांक मिळविला. तर गांधारपाले येथील आदिनाथ वारकरी हरिपाठ यांनी द्वितीय क्रमांकाचे, तर नांदवीच्या गुरुदेव दत्त प्रासादिक मंडळाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. बोरज येथील संत जनाबाई हरिपाठ मंडळ, सडवली येथील विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ आणि चांढवे येथील हनुमान महिला मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्व विजेत्या हरिपाठ मंडळांना जगताप, रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत जगताप, प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीयश जगताप, हभप प्रशांत पानसरे, महाड तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र कोरपे, शहराध्यक्ष सुदेश कळमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्रीधर सकपाळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या हरिपाठला परीक्षक म्हणून गणपत येसरे (खेड), केशव भागडे( इगतपुरी) आणि अजित देशमुख (महाड) यांनी काम पाहिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07655 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..