महाडमध्ये टंचाईग्रस्त गावांची साठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमध्ये टंचाईग्रस्त गावांची साठी
महाडमध्ये टंचाईग्रस्त गावांची साठी

महाडमध्ये टंचाईग्रस्त गावांची साठी

sakal_logo
By

महाड, ता. ९ (बातमीदार) : दिवसेंदिवस वाढणारी उन्हाची तीव्रता आणि त्यामुळे आटलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत यामुळे महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी साठी पार केली आहे. तालुक्यात सद्यस्थितीत ९ गावे आणि ६० वाड्या अशा एकूण ६९ ठिकाणी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच तालुक्यातील गावांची टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत आहे. रायगड किल्ला परिसरातही टंचाई जाणवू लागल्याने याचा परिणाम पर्यटनावरही होत आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व पूरपरिस्थिती निर्माण होत असतानाही अनेक गावांना उन्हाळ्यात मात्र पाणीपाणी करावे लागते. गतवर्षी मुबलक पाऊस झाला असला, तरीही टंचाई आराखड्यात ३३ गावे आणि १७४ वाड्यांचा समावेश करावा लागलेला आहे. पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी एप्रिल मध्यापर्यंत टिकून होती. परंतु वाढलेल्या तापमानामुळे नद्या, नाले, विहिरी, विंधनविहिरी हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आटल्याने तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महाड तालुक्यात १८५ नळपाणी पुरवठा योजना आहेत. परंतु, पाण्याचे स्रोत संपल्याने या योजना ठप्प झाल्या आहेत. नद्या, नाले आटल्याने गुरांना लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दुर्गम भागात पाण्याचे अन्य स्रोत उपलब्ध नसल्याने सद्यस्थितीत आठ गावे आणि ५९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पिंपळकोंड, वीर, निगडे, नातोंडी, पाचाड गाव व वाड्या, पुनाडे, शेवते मोहोत, निजामपूर, खर्डी, तळिये, नेराव, आढी या गावांना व वाड्यांना टंचाईची झळ पोहचत आहे. या ठिकाणी टँकर पाणीपुरवठा हाच आधार उरला आहे. दररोज टँकर जात नसल्याने पाणी पुरवून वापरावे लागत असते. उन्हाळ्याच्या सुटीचे दिवस असल्याने अनेक गावांमध्ये मुंबई, सुरत, पुण्याकडील चाकरमानी राहण्यासाठी येत असतात. त्यातच लग्नसराईमुळे पाण्याची गरजही वाढत असल्याचे टंचाईग्रस्त गावातील गृहिणी मंगला सावंत यांनी सांगितले. काही ठिकाणी ग्रामस्थ खासगी वाहनांतूनही पाणी आणत आहेत. गुरा-ढोरांना डबक्यात साचलेले पाणी पाजण्यासाठी दूरवर न्यावे लागते. महिलावर्गही कपडे धुण्यासाठी नदीत साचलेल्या पाण्याचा वापर करत आहेत. या टंचाईचा सर्वाधिक फटका दुर्गम भागात असलेल्या आदिवासी व धनगरवाड्यांना जाणवत आहे. कावळे धनगरवाडी, गोंडाऴे आदिवासीवाडी, आढी गौळवाडी, पारवाडीच्या आदिवासीवाड्या, वीर खरबकोंड अशा वाड्यांत ग्रामस्थांना पिण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

पर्यटकांसाठी विकतचे पाणी
रायगड किल्ला, गडाचा पायथा तसेच पाचाड व हिरकणी वाडीतही पाण्याचे स्रोत संपल्याने टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत आहे. या ठिकाणी दररोज पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यांची निवास व्यवस्था करावी लागत असल्याने पाण्याची गरज भागवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे हॅाटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी सांगितले.

..............
गावातील पाण्याची स्थिती पाहून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावांची मागणीही वाढत आहे. मागणीनुसार गरज तपासून वाढीव टँकरची मागणी केली जात आहे.
- भाऊसाहेब पोळ, गटविकास अधिकारी, महाड

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07676 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top