
हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वणवण
सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा
महाड, ता. १० ः ‘जो पानी ढोरं बी पिनार नाय, तो पानी आमी पितो, या पान्यानी पोरबालं आजारी परतात, पन करनार तरी काय, पाण्याचे हे दुर्भिक्ष सांगताना आदिवासी महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. महाड तालुक्यातील पारवाडी या आदिवासीवाडीला अनेक वर्षे भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या आजही कायम आहे. गेली अनेक वर्ष टाहो फोडूनही सरकारकडून पाण्याची व्यवस्था करता आलेली नाही. नदीतील खराब पाण्यात लहानलहान डबकी (डूरा) खणून त्या पाण्यावर आदिवासी तहान भागवत आहेत.
मांडले पारवाडीत तीन आदिवासी वाड्या आहेत. तीनपैकी दोन आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. वाडीत जवळपास ६० घरे आहेत. पारवाडीसाठी अद्याप एकही पाणी योजना आलेली नाही. लगतच्या गावात राबवलेली नळ पाणीपुरवठा योजना आदिवासी वाडीवर गेलीच नाही. यामुळे स्थानिक आदिवासींना ओढा व विहिरीतील पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते.
येथील ओढ्यावर बंधाऱ्याचे कामही करण्यात आले आहे. परंतु पाण्याची साठवणूक करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. एप्रिल महिन्यापासूनच वाडीला पाणीटंचाई जाणवू लागते. नदी व ओढे कोरडे पडू लागतात आणि विहिरीनेही तळ गाठते. त्यामुळे पाण्यासाठी आदिवासींना दोन ते तीन किलोमीटर अंतर कापावे लागते. अनेकदा नदीतील रेती व दगड बाजूला करून त्यात छोटी छोटी डबकी तयार करून वाटीवाटीने पाणी भरून ते आपली गरज भागवतात.
पिण्याच्या पाण्यासाठी रोजची वणवण ठरलेली आहेच शिवाय कपडे, भांडी आदी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी गढूळ पाण्याचा आधार घ्यावा लागतो. आपल्या व्यथा मांडतांना वाडीवरील पातू पवार, चंद्रा मोरे, एकीबाई वाघमारे, उषा काटकर या महिलांना गहिवरून आले. नदीमध्ये एक विहीर खोदावी, अशी मागणी आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून पंचायत समितीकडे करीत आहेत, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील डोंगर दऱ्यांमध्ये आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहेत. या आदिवासी वाड्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षोनुवर्षे भेडसावतो. शासन दरबारी आदिवासी घटक आजही उपेक्षित असल्याने या वाड्यांवर पाणी पुरवठ्यासाठी फारसे नियोजन केले जात नाही. भारत निर्माण अभियान, पथदर्शी योजना, राष्ट्रीय पेयजल योजना अशा योजनांतून पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाच पारवाडी -आदिवासीवाड्यांवर मात्र हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वणवण करावी लागते.
पारवाडी आदिवासी वाडीसाठी विहीर बांधण्याचा प्रस्ताव केला होता. परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही. आता या वाडीला जलजीवन मिशन योजनेमधून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.
- जगदीश फुलपगारे, अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाड
गेली अनेक वर्ष पारवाडी आदिवासीवाडीवर नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी योजना राबवावी अशी मागणी होत आहे, मात्र या वाडीवर एकही योजना राबवण्यात आलेली नाही. यामुळे भविष्यात येणाऱ्या निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांना याबाबत जाब विचारला जाईल.
- अंकुश काटकर, अध्यक्ष, आदिवासी समाज संघटना
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07679 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..