हापूसच्या गर्दीत रायवळ हरवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हापूसच्या गर्दीत रायवळ हरवला
हापूसच्या गर्दीत रायवळ हरवला

हापूसच्या गर्दीत रायवळ हरवला

sakal_logo
By

सुनील पाटकर, महाड
स्वाद आणि रस अशा गुणवैशिष्ट्यांनी नटलेला आंबा म्हणजे रायवळ आंबा. रायवळ आंबा चोखून खाण्यात मजा सांगता येत नाही तर ती अनुभवावी लागते. कोकणात ज्यांनी रायवळ चाखला नाही, असा आंबाप्रेमी सापडणे विरळच. रायवळ आंबा खाताना त्याचा रस तोंडभर पसरलाच पाहिजेच. हाताच्या कोपरापर्यंत रस आला नाही, तर रायवळची लज्जत पूर्ण होत नाही. रायवळ आंब्याची ही लज्जत हापूसच्या गर्दीत आता हरवून गेली आहे. घराघरात हजेरी लावणारा हा रायवळ बाजारातूनही दिसेनासा झाला आहे.


भारतात देशी आंब्याच्या अनेक जाती आहेत. परंतु, हापूस आंब्याचे व्यावसायिकरण झाल्यानंतर अनेक आंब्यांना ग्रहण लागले. कोकणातील रायवळही असाच हरवून गेला. कुठल्याही जमिनीवर सहज वाढणारा हा आंबा, त्याची फार काही जोपासनाही करावी लागत नाही. ग्रामीण भागात वाडी-वस्तीत, अंगणात, परसात, बांधावर रायवळ आंब्याची अनेक झाडे दिसायची. रस्त्यावरून जाताना झाडावर लगडलेले आंबे दगडाने नेम धरून पाडून तिथेच खाण्याची मज्जा काही औरच. बच्चे कंपनी पाडलेल्या कच्च्या आंब्याची चुपचाप अढी लावून ठेवत. हापूस आंबे जसे चव आणि आकाराने सारखेच असतात, तसे रायवळचे नाही. प्रत्येक झाडावरील आंब्याची चव, रंग व आकार वेगवेगळे असतात. काही खूपच गोड असतात तर काही आंबट. यावरूनच त्यांची नावे ठेवली जातात. साख-या आंबा, बाटल्या आंबा, लिट्टी आंबा, खोबरी आंबा, बिटक्या आंबा, अशी शेकडो नावे असतात.
गावातील सीमाही रायवळ आंब्याच्या नावावरून ओळखल्या जात; परंतु आता हे आंबे दिसेनासे झाले आहेत. हापूसचा रुबाब व भाव वाढल्याने रायवळ दुर्लक्षित झाला. रायवळ आंबा कैरी लोणच्यासाठी वापरला जायचा; परंतु अलीकडे हापूस आंब्याचेही लोणचे घातले जात आहे. हिंदू धर्मामध्ये अनेक विधींसाठी रायवळ झाडांची तोड वाढली. फार्म हाऊस, रस्ता रुंदीकरण याबरोबरच आंबा पेटीसाठी आणि वापरासाठी या झाडांची कत्तल होऊ लागली. त्यातच या झाडांवर हापूसचे कलम करण्याचे प्रकार वाढल्याने झाड रायवळचे राहिले; पण फळ हापूसचे येऊ लागले. शिवाय, फलोत्पादन योजनेने हापूस लागवडही वाढली. अशा अनेक कारणांमुळे रायवळचे उत्पादन घटत गेले. टिकाऊपणा कमी असल्याने मागणीही कमी झाली. त्यामुळेच कोकणच्या मातीतील हा अस्सल रायवळ आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
....
रायवळ आंब्यात अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. त्यात रसही मुबलक असतो. नष्ट होणार्‍या या जातीची लागवड व संशोधन वाढले पाहिजे.
- अजित देसाई, बागायतदार
...
महाड : रायवळ आंबा लगडलेली झाडे आता दुर्मिळ झाली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07686 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top