
रायगडावर ६ जूनला शिवराज्यभिषेक दिन सोहळा
महाड, ता. ३० (बातमीदार) ः अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडणार आहे. समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावर ५ ते ६ जूनला विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे हा उत्सव साधेपणाने साजरा झाला होता; परंतु यंदा मात्र रायगड पुन्हा दुमदुमणार आहे.
यंदाच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची'' तसेच ‘जागर शिवशाहिरांचा... स्वराज्याच्या इतिहासाचा'' व ''सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा'' हे कार्यक्रम आकर्षण ठरणार आहेत. पाच जूनला सायंकाळी संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन होऊन पाच वाजता ''धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची'' हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे; तर सायंकाळी सात वाजता राज दरबार येथे ''जागर शिवशाहिरांचा... स्वराज्याच्या इतिहासाचा'' हा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत. ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम असून सकाळी सहा वाजता ध्वजपूजन व ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. या वेळी मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाईल. यानंतर पालखी सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता होईल. या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावेळी सर्व शिवप्रेमींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07729 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..