
रायगड जयघोषांनी दुमदुमला
महाड, ता. ६ (बातमीदार) ः डफ, ढोलताशे, शाहिरांचे पोवाडे आणि मंत्रोच्चारात आज शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक करत शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी सर्वत्र भगवे ध्वज आणि शिवप्रेमींच्या जय भवानी, जय शिवाजी या जयघोषाने रायगडाच्या कडेकपाऱ्या दुमदुमल्या.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी युवराज शहाजीराजे, मावळचे आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, मनसे आमदार राजू पाटील, समितीचे अध्यक्ष फतेसिंह सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
रायगडावरील आल्हाददायी व मंगलमय वातावरणात सकाळी नगारखान्याजवळील ध्वजाचे पूजन व रोहण करून कार्यक्रम पार पडला. राजसदरेवर शाहिरी मुजरा रंगला. गडावर वाजणारे ढोलताशे, होळीच्या माळावर लाठ्याकाठ्या, भाले तलवारीसह खेळल्या जाणाऱ्या मर्दानी खेळाने या सोहळ्यात रंगत आणली होती. यामुळे गडावर साक्षात शिवकाल अवतरल्याचे भासत होते. संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाजतगाजत राजसदरेवर आणण्यात आली. राजसदरेवर महाराजांच्या प्रतिमेची छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली व शिवरायांच्या मूर्तीवर संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांनी सुवर्णनाणी, सप्त नद्यांचे जल व दुग्धाभिषेक केला.
सुवर्णनाण्यांनी अभिषेक
मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्णनाण्यांचा अभिषेक करण्यात आला. रायगडावरील हा सुवर्णक्षण पाहण्यासाठी लाखो नजरा स्थिरावल्या होत्या. यानंतर ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या संकल्पेवर विविध पारंपरिक वाद्यांच्या स्वरात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक राजसदर ते शिवसमाधीपर्यंत काढण्यात आली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07752 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..