
महाडमध्ये आवाज भरत गोगावलेंचा
महाड, ता. २६ (बातमीदार) : शिवसेनेच्या बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले महाडचे आमदार भरत गोगावले यांचाच आवाज महाडमध्ये असल्याचे दिसून आले. आमदार भरत गोगावले यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या बैठकीत आपण गोगावले यांच्या पाठीशी असल्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे बहुसंख्य पदाधिकारी आमदार गोगावले यांच्यासोबत असल्याचे सभेत दिसून आले.
शिवसेनेतील गटबाजीचे राजकारण आता शिगेला पोहोचले असतानाच प्रत्येक गट ठिकठिकाणी आपली ताकद दाखवत आहे. महाडचे आमदार भरत गोगावले हेदेखील या बंडात सहभागी झाल्याने आणि शिंदे गटाने त्यांची प्रतोदपदी निवड केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे महाड मतदारसंघातही गोगावले समर्थकांनी आपली ताकद दाखवली. महाड तालुक्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक २३ जूनला ढालकाठी येथे झालेल्या सभेला उपस्थित होते. भरत गोगावले यांची साथ न सोडण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला.
या वेळी तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, विजय सावंत, माजी सभापती विजय धाडवे व सपना मालुसरे, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र तरडे, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, मनोज काळीजकर, मैथली खेडेकर, निकिता ताठरे, तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानाबाहेर झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपला रोष राष्ट्रवादी काँग्रेसवर काढत जिल्ह्यात पालकमंत्री कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. या बैठकीच्या निमित्ताने शिवनेरी निवासस्थानी आणि बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिवसेना संपवण्याचे काम
तीन वेळा आमदार झालेल्या भरत गोगावले यांना महाविकास आघाडीत मंत्रिपद मिळेल, अशी आशा महाडकरांना होती. मात्र, त्यांना मंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले. जिल्ह्यात वारंवार निधी वाटपातही शिवसेनेवर कायम मागे ठेवले जात होते. त्यातच आमदार गोगावले यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम पालकमंत्री करत आहेत, असे सुरेश महाडिक यांनी सांगितले. आम्ही शिवसेनेचेच पण शिवसेना संपवण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप जिल्हा मनोज कळीजकर यांनी केला.
...............
आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत...
आमदार भरत गोगावले यांच्या समर्थकांनी घेतलेल्या बैठकीला काही जण अनुपस्थित होते. उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोर यांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे समाज माध्यमांवर जाहीर केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07815 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..