महाडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात; राज्य सरकारचा निर्णय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDRF Team
महाडमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल

महाडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात; राज्य सरकारचा निर्णय!

महाड : महाड शहरासह संपूर्ण तालुक्यावर पावसाळ्यात पूर, दरड कोसळणे अशा आपत्तीची टांगती तलवार असते. गेल्या वर्षी महापुराने थैमान घातले होते. तळियेमध्ये तर दरड कोसळून ८६ जणांचे बळी गेले होते. त्याच पार्श्वभूमीवर आपत्तीकाळात तत्काळ मदतकार्य सुरू करता यावे, यासाठी पुढील दोन महिने एनडीआरएफचे पथक महाड येथे तैनात करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी झाली असून, २५ जणांचे एनडीआरएफचे पथक सोमवारी (ता. ४) महाडमध्ये दाखल झाले. यामुळे महाडकरांना दिलासा मिळाला आहे.

रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती होत असते. यामध्ये महाड व पोलादपूर तालुके हे आपद्ग्रस्त तालुके म्हणून ओळखले जात आहेत. या परिसरामध्ये महापूर, दरडी, इमारती, पूल कोसळणे, रेल्वे, बस अपघात, औद्योगिक अपघात अशा प्रकारच्या घटना घडत असतात. अनेकदा आपत्तीनंतर तातडीने मदतकार्य मिळत नसल्याने; तसेच मदतकार्यामध्ये मर्यादा येत असल्याने एनडीआरएफचे पथक मागवावे लागते. पथक दाखल होईपर्यंत विलंब होत असल्याने मोठी हानी होते. मागील वर्षी महाड व चिपळूण येथे २२ जुलैला आलेल्या महाप्रलयानंतर या ठिकाणी नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला योग्य व्यवस्था व वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे महाड येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरूपी असावे, अशी मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीला केंद्र आणि राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. महाड येथील शासकीय दूध योजना असलेले २.५७.४६ हेक्टर आर. इतके क्षेत्र राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) कायमस्वरूपी बेस कॅम्प तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.

पुढील दोन-तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून एनडीआरएफचे पथक सोमवारी महाडमध्ये दाखल झाले आहे. २५ जणांचे पथक आता पुढील दोन महिने महाड शहरात तळ ठोकणार आहे. पथकाचे प्रमुख बी. महेश यांच्याशी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार सुरेश काशिद यांनी चर्चा करून दरडग्रस्त गावांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे उद्यापासून पथकाचा दौरा होणार आहे. हे पथक संत रोहिदास सभागृहात वास्तव्यास असतील. त्यांच्यासोबत महाड नगर परिषदेचे पथक, साळुंखे रेस्क्यू टीमही आपत्तीकाळात मदतीसाठी असणार आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनाकडून बचाव साहित्य पुढील आठवड्यात प्राप्त झाल्यानंतर त्याचे तातडीने गरजेनुसार वाटप करण्यात येईल.
- प्रतिमा पुदलवाड, प्रांताधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07844 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..