
महाडमध्ये पूरस्थिती निवळली
महाड, ता. ५ (बातमीदार) ः महाडमध्ये निर्माण झालेली पूरसदृश परिस्थिती काहीशी निवळली असली तरी पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुसळधार पावसाने दरडग्रस्त दासगावातील अंतर्गत रस्त्याची संरक्षक भिंत ढासल्यामुळे भिंतीलगतच्या घरांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या २४ तासात महाडमध्ये १८८ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी महाडमध्ये निर्माण झालेली पूरसदृश स्थिती काहिशी कमी झाली आहे. दरडग्रस्त दासगावमध्ये मंगळवारी सकाळी संरक्षण भिंत ढासळल्याने रस्ताही खचला आहे.
दासगावच्या भोईवाडा परिसरात २००५ मध्ये दरड कोसळून ४८ जणांचा बळी गेला होता. तर अनेकजण बेघर झाले. दरडग्रस्तांचे पुनर्वसन झाले असले तरी सध्यस्थितीत भोईवाड्यामध्ये १६८ घरे असून ९०० ग्रामस्थ वास्तव्य करतात. वाडीला दरवर्षी पावसाळ्यात घरे खाली करण्याच्या नोटीस महसूल प्रशासनाकडून दिल्या जातात.
रस्त्यालगतची संरक्षक भिंती कोसळल्याने अर्जुन पड्याळ यांच्या घरालाही धोका निर्माण झाला आहे. दरम्यान दासगाव येथे भाजपचे विधान परिषद विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी पाहणी करून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद यांनीही या भागाला भेट दिली आहे. भिंतीमुळे खचलेला रस्ता हा सुमार दीडशे घरांच्या रहदारीचा मार्ग आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07848 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..