पाचाड धर्मशाळेचे काम निकृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचाड धर्मशाळेचे काम निकृष्ट
पाचाड धर्मशाळेचे काम निकृष्ट

पाचाड धर्मशाळेचे काम निकृष्ट

sakal_logo
By

महाड, ता. १७ (बातमीदार) : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या धर्मशाळेचे काम रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून केले जात आहे. जुन्या इमारतीवरच हे काम केले जात असल्याने नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
पाचाड येथे सुमारे ४० वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धर्मशाळा बांधण्यात आली आहे. या धर्मशाळेमुळे पर्यटक आणि शैक्षणिक सहलीसाठी राहण्याची सुविधा व्हायची. काही वर्षांपासून दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण देत धर्मशाळा पडीक अवस्थेत आहे. किल्ले रायगड संवर्धनातील विविध कामांना सुरुवात झाल्यानंतर रायगड प्राधिकरणाकडून धर्मशाळेचीही दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. मुळातच ही इमारत सुस्थितीत असली, तरी वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे. या इमारतीच्या परिसरात शौचालय आणि स्वच्छतागृह, संरक्षक भिंत उभी केली आहे. मात्र, अद्याप स्वच्छतागृहाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. तर मूळ इमारतीच्या छपराचे कामही अपूर्ण आहे.
इमारतीचा मूळ ढाचा तसाच ठेवून वरील छपरावरील काम केले जात आहे. संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट झाल्याने दोन ठिकाणी ते ढासळले आहे. पाचाडमध्ये पाण्याची टंचाई असल्याने या कामाला पुरेसा पाण्याचा वापर झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मूळ इमारत तोडून पुन्हा नव्या इमारतीची उभारणी करणे आवश्यक होते; मात्र तसे न करता जुन्या इमारतीवरच काम करून लाखो रुपयाचा चुराडा केला जात आहे.
रायगडावर प्रतिवर्षी लाखो शिवप्रेमी, शैक्षणिक सहलीही मोठ्या प्रमाणावर येत असतात. या सहलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना खासगी हॉटेलमध्ये राहणे परवडणारे नसते. त्‍यामुळे धर्मशाळेचा वापर विद्यार्थी आणि शिवप्रेमींना राहण्यासाठी सोयीस्कर असे. शिवाय, विविध छोटे कार्यक्रमही यामध्ये केले जात होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ही धर्मशाळा निधी आणि कर्मचारीअभावी अनेक वर्षांपासून धूळ खात पडून राहिली. यामुळे या ठिकाणी पाणी, स्वच्छता आणि विजेचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर धर्मशाळेची दुरुस्ती रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून केली जात आहे.

......
मूळ इमारत तोडून वाढत्या पर्यटकांचा विचार करून नव्या पद्धतीने इमारत बांधणे अपेक्षित होते. मात्र, जुन्या इमारतीवरच काम करून रायगड प्राधिकरण पैसे वाया घालवत आहे. याशिवाय संरक्षक भिंतही निकृष्ट पद्धतीची झाली आहे.
- जयेश लामजेण, स्थानिक
......
पाचाड धर्मशाळेचे काम प्लाननुसार होत असून, छपराचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. मूळ इमारत मजबूत असल्याने केवळ वरील काम केले जात आहे.
- स्वप्नील बुर्ले, शाखा अभियंता, रायगड प्राधिकरण
.....

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07879 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top