
धोकादायक गावात ५ दिवस पाहणी दौरा
महाड. ता. २० (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमिवर धोकादायक गावांमध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती घडू नये, यासाठी महाड महसूल विभाग सतर्क झाला आहे. तालुक्यातील ७२ धोकादायक गावांमध्ये प्रशासनाकडून १९ जुलै ते २३ जुलै या पाच दिवसाच्या कालावधीसाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन व पाहणी दौरे करण्यात येत आहेत.
महाडमध्ये गतवर्षी २२ जुलैला महापुराने थैमान घातले होते. तळिये गावात दरड कोसळून ८६ जणांचा बळी गेला होता. महाड तालुक्यात १९९४, २००५ मध्ये दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढताच प्रशासन व ग्रामस्थ चिंतेत असतात.
महाड तालुक्यातील गावांची भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. महाड तालुका डोंगराळ असल्याने सर्वेक्षणामध्ये ७२ गावांना दरडीचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा महसूल विभागामार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी दरडग्रस्त गावांचा दौरा करीत असून नागरिकांना दरड व अन्य आपत्तीमध्ये कोणत्या प्रकारे खबरदारी घ्यावी, यासाठी मार्गदर्शन करीत असून प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, स्थलांतर, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, मदत कार्याची माहिती ग्रामस्थांना दिली जात आहे.
मंगळवारपासून पाहणी दौरा सुरू झाला असून पाच दिवसाच्या कालावधीत महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रदीप कुडळ व अरविंद घेमुड, काशिनाथ तिरमले आणि सर्व मंडळ अधिकारी तसेच सर्व तलाठी यांचे पथक तयार केले आहे. ते ७२ गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07887 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..