
महाडमधील सावित्री नदी काळवंडली
महाड, ता. २७ (बातमीदार) ः महाडमधून वाहणाऱ्या सावित्री नदीचे पाणी दोन दिवसांपासून काळवंडले आहे. पावसाचा फायदा घेत औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून रसायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून नदीकिनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रदूषण मुक्तीचा दावा करणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांकडून दूषित पाणी सोडले जात आहे. सध्या पावसाचा जोर कमी आहे, त्यात नदीपात्रातील पाणी काळे पडल्याचे दिसून आले. कंपन्यांकडून थेट नदीपात्रात अथवा वाहनाने रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. दादली पुलाजवळ सावित्री नदीच्या पाण्यावर काळा तवंग निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर काही सजग नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड कार्यालयाला कळवून कारवाईची मागणी केली आहे.
महाड एमआयडीसीतील कंपन्यांचे प्रदूषण हा नेहमीच चिंतेचा विषय बनला असून थेट कारवाया होऊनही नदी प्रदूषित होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. पावसाळ्यात कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडण्याचे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावण्यात येतात, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने नदीत रसायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार वारंवार घडतात. पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहने रात्रीच्या वेळी नदीत रसायने सोडत असावीत, अशी शक्यता प्रदूषण मंडळाकडून व्यक्त केली जात आहे.
सावित्री नदीपात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याने स्थानिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. येथील अनेक लोकांचा उदरनिर्वाह नदीपात्रातील मासेमारीवर आहे, दूषित पाण्यामुळे मासे मरत असल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल. प्रशासनाने तत्काळ प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करावी.
- अनंत कांबळे, स्थानिक रहिवासी, महाड
सावित्री नदीचे पाणी काळे पडले असून पाण्याचे नमुने घेतले आहेत. प्रथम दर्शनी पाण्यात घातक रासायनिक घटक आढळून येत नसले तरी पावसाचा फायदा घेत सांडपाणी वाहतूक करणारे पाणी सोडून देत असावेत, असा अंदाज आहे.
- संदीप सोनावणे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07902 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..