
पावसाने दडी मारल्याने भातालावणीसाठी पंपाद्वारे पाणीपुरवठा
महाड, ता.२ (बातमीदार)ः मुसळधार कोसळणारा पाऊस जुलै अखेरपासून अचानक गायब झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आठवडाभर पावसाने दडी मारल्याने अखेर काही शेतकऱ्यांनी नदीतून पंपाद्वारे पाणी उपसा करीत भातलावणी सुरू ठेवली आहे. वातावरणात निर्माण झालेल्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत.
महाडसह संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण अधिक आहे. या संपूर्ण भागात लाल मातीचा थर असून ही माती पाणी धरून ठेवत नाही. उंच सखल भागामुळे पावसाचे पाणी क्षणात वाहून थेट मोठ्या नद्यांना, खाड्यांना जाऊन मिळते. जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. परंतु महिनाअखेरीस पावसाने दडी मारली.
महाड तालुक्यातून सावित्री, गांधारी, आणि काळ या नद्यांनी पावसाळ्यात पुराचा इशारा दिला, परंतु आता मात्र महाड नद्यांनी तळ गाठला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे यंदा शेतकऱ्यांच्या भात लावणीदेखील लांबणीवर गेली. भातलागवडीसाठी पावसाची गरज असल्याने शेतकरी भाताची रोपे करपतात कि काय या चिंतेत आहेत.
तालुक्यातील ओसंडून वाहणारी धरणांतील पाणीपातळीही कमी झाली आहे. आतापर्यंत महाड तालुक्यात १ हजार ६८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचा दिवसापर्यंत २ हजार ५४२ मिमी एवढा पाऊस पडला होता.
डिझेल पंपाने पाणी उपसा
महाड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने अखेरच्या टप्प्यात होणारी भातलावणी खोळंबली आहे. यामुळे तालुक्यात अनेक भागात डिझेल पंप लावून नदीतील पाणी शेतात घेतले जात असून याद्वारे रखडलेली भात लावणी पूर्ण केली जात आहे. शेत जमिनीत पाणी नसल्याने भेगा देखील पडू लागल्या आहेत. पावसाळ्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.
खाडीपट्ट्यात मलखंडी शेती असल्याने पाऊस लागतो. पाऊस चांगला झाला तर ४ खंडी या शेतीतून भाताचे पीक मिळते. यंदा पावसाचा जोर अचानक कमी झाल्याने पंपाद्वारे नदीचे पाणी घेऊन लावणी सुरू आहे. लावणी करून शेती पुढे चांगली येईल की नाही, हेही सांगणेही आता कठीण आहे.
- अक्षय जाधव, शेतकरी
Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07913 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..