ओवसा भरण्यासाठी प्रथा आजही कायम, नववधूंमध्ये उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओवसा भरण्यासाठी प्रथा आजही कायम, नववधूंमध्ये उत्साह
ओवसा भरण्यासाठी प्रथा आजही कायम, नववधूंमध्ये उत्साह

ओवसा भरण्यासाठी प्रथा आजही कायम, नववधूंमध्ये उत्साह

sakal_logo
By

ओवसा परंपरेचा नववधूंमध्ये उत्साह

ग्रामीण भागात शेताच्या बांधावरून, रस्त्यावरून वा पाऊलवाटेने हातात व डोक्यावर सूप घेऊन जाणाऱ्या नववधू दिसू लागल्या की समजावे ओवसा भरण्याची लगबग सुरू झाली. रायगड जिल्ह्यामध्ये गौराईचे आगमन धूमधडाक्यात झाले. आता रविवारच्या गौरीपूजनानिमित्त ओवसा भरण्यासाठी नवविवाहितांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. गौराई म्हणजे आदिशक्तीचे रूप आणि पूजेसाठी भरलेले सूप म्हणजे ऐश्वर्याचे अन् मांगल्याचे प्रतीक मानले जाते. याच पवित्र धारणेतून आजही ओवसा भरण्याची परंपरा कायम आहे.

सुनील पाटकर, महाड
रायगड जिल्ह्यामध्ये ओवसा भरण्याची प्रथा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ओवसा म्हणजे ओवसणे किंवा ओवाळणे. ग्रामीण भागामध्ये त्याला ववसा असेही म्हणतात. लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरीचे आगमन पूर्वा नक्षत्रामध्ये होते तेव्हा घरामधील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत असते. लग्नानंतरचा हा विधी झाल्यानंतर प्रत्येक वर्षी गौरीसमोर या महिला ओवसा भरू शकतात; परंतु लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला, तर मग पुढील वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात, तोपर्यंत नववधूला ओवसा भरण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच या वर्षी ओवसा भरण्यासाठी नववधूची धावपळ सुरू आहे. बस, रिक्षा किंवा खासगी वाहनांमधून; तर काही ठिकाणी महिला पायी सुपांचा ओवसा पूजेसाठी नेताना दिसत आहेत.
ओवसा भरण्यासाठी मोठा उत्साह असतो. नववधूला मिळणारा मान व सर्व कुटुंबात एकत्र येऊन सण होत असल्याने मानसिक समाधान व बळ मिळते, असे नववधू मीना परब यांनी सांगितले.

नववधूचा सन्मान
पहिला ओवसा हा नववधूचा घरातील मानसन्मान मानला जातो. घरामध्ये आलेल्या सुनेचा आदर करण्याची व तिला आवडीच्या भेटवस्तू देण्याची ही प्रथा आहे. पूजेची सुपे वाटण्याच्या निमित्ताने घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोरामोठ्यांची ओळख करून दिली जाते. गौरीच्या आगमनात अशा प्रकारे घरातील गौराईचेही स्वागत व सन्मान केला जात असतो. सासर व माहेरच्या नातेवाईकांना सुपे दिली जातात व त्या बदल्यात नववधूला साडी, दागिने अथवा तिच्या आवडीच्या इतर भेटवस्तू देऊन तिचा मानसन्मान केला जातो. सासर व माहेर असा दोन्हीकडे तिचा सन्मान होतो.

अशी होते पूजा
एका सुपात पाच प्रकारच्या भाज्या, पाच प्रकारच्या वेलींची पाने, पाच प्रकारची फळे, करंडा, फणी, ओटी (खण व नारळ) आणि पानावर सुटे पैसे असे सर्व ठेवले जाते. अशी पाच सुपे गौरीसमोर ठेवली जातात. घरातील सुहासिनींकडून गौरीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर दोन्ही हातांनी भरलेले सूप गौरीसमोर धरून तीन वेळा वर-खाली फिरवले जाते. यालाचा ओवसणे म्हणतात. नववधू प्रथम पाच सुपांनी आपल्या माहेरच्या गौराईला ओवसते. नंतर सासरी सूप आणून सासरच्या गौराईला ओवसण्याची परंपरा आहे. गौरीचे पूजन करून तिच्याकडे अखंड सौभाग्याचे लेणे मागितले जाते.

सुपांची परंपरा
ओवशाच्या प्रथेमध्ये सुपांना फार महत्त्व आहे. सूप घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते. भरलेले सूप देणे हे ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक असते. माहेरची आणि सासरची काही ठराविक सुपे गौराईसमोर मांडली जातात. बांबूपासून तयार केलेली पाच किंवा दहा सुपे पूजेसाठी ठेवली जातात. त्यामुळे बाजारात सुपांच्या संचांना मोठी मागणी असते. सुपांच्या किमतीही या काळात वाढतात. तब्बल हजार रुपयांना पाच सुपे विकली जातात. सुपांना हळद-कुंकू लावले जाते. त्यात रानभाज्यांची पाने, पाच प्रकारची फळे, सौभाग्य लेणी, सुका मेवा, उपलब्ध असलेले वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आदी सर्व गौरीच्या समोर ठेवून तिची ओवाळणी केली जाते. भक्तिभावाने ओटीही भरली जाते. त्यानंतरही सुपे सासर व माहेरच्या नातेवाईकांना दिली जातात. त्या बदल्यात नववधूला साडी अथवा इतर भेटवस्तू देऊन तिचा मानसन्मान केला जातो. सुपे वाटताना सध्या रायगड जिल्ह्यातील घरोघरी ओवसा भरण्याची लगबग मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

सौभाग्याच्या लेण्यासाठी...
गौराईला आदिशक्तीचे रूप मानले जाते. अशी शक्ती असणाऱ्या सामर्थ्यवान मुली आणि सुना मिळाव्यात, पूजेसाठी भरलेले सूप ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक असल्याने घरात कायम सुखसमृद्धी राहावी आणि सौभाग्याचे लेणे अखंडित राहावे, यासाठी ही पूजा करण्याची प्रथा आहे. अशी ही ओवसा भरण्याची प्रथा रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही मोठ्या उत्साहात जपली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07992 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..