दक्षिण रायगडमध्ये ५० टन फुलांची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण रायगडमध्ये ५० टन फुलांची आवक
दक्षिण रायगडमध्ये ५० टन फुलांची आवक

दक्षिण रायगडमध्ये ५० टन फुलांची आवक

sakal_logo
By

महाड, ता. २५ (बातमीदार) ः नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. घराघरांमध्ये झेंडू फुलांच्या माळा आणि सजावट करण्याची परंपरा आजही जोपासली जात असल्याने बाजारपेठेत झेंडूची आवक वाढली आहे. दक्षिण रायगडमध्ये सुमारे ५० टन झेंडूची आवक झाली असून दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपये इतका आहे.
महाडच्या बाजारपेठेत वाई मार्केटमधून झेंडूची आवक झाली आहे. सातारा, सांगली, कोल्हापुर, पुणे, जेजुरी, बारामती, नीरा येथून झेंडू प्रमुख बाजारात पाठवले जातात. परंतु मागील काही वर्षांमध्ये दक्षिण रायगडमध्येही झेंडूची लागवड केली जात आहे. दरवर्षी स्थानिक फूल विक्रेत्यांप्रमाणेच भोर, सासवड येथून काही शेतकरी फूल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. परंतु पावसामुळे यंदा विक्रेत्यांचे अजून आगमन झालेले नाही. बाहेरील विक्रेते आल्यानंतर हा झेंडूचा दर आणखी घरून ४० ते ५० रुपये प्रति किलोने विकला जात असतो. झेंडूत पिवळा, केसरी, लाल असे प्रकार असून एकत्रित फुले खरेदी करण्याला ग्राहकांची पसंती आहे.

फुलांना मोठी मागणी
घटस्थापनेपासून दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवदेवतांना अर्पण केली जाते. सार्वजनिक मंडळे, देवस्थाने येथे फुलांची मोठी मागणी असते. या वर्षी दक्षिण रायगडमध्ये दोनशेपेक्षा अधिक फुलांची दुकाने थाटण्यात आली असून सुमारे ५० टन फुले विक्रीसाठी आली आहेत. महाड शहर, बिरवाडी, माणगाव, गोरेगाव, पोलादपूर, तळा, इंदापूर, श्रीवर्धन, म्हसळा, निजामपूर बाजारपेठेतही झेंडूच्या फुलांचा बहर आला आहे.

पावसामुळे खराब होण्याची शक्‍यता
कलकत्ता आणि नामधारी अशा दोन प्रकारांमध्ये झेंडूच्या फुलांची दक्षिण रायगडमध्ये आवक होते. बहुतांशी व्यापारी वाई, बारामती, पुणे या ठिकाणांहून फुलांची खरेदी करतात. पावसामुळे झेंडूची फुले टिकण्याची शक्‍यता कमी असल्‍याने जो दर मिळेल, त्या दरांमध्ये विक्री करून विक्रेत्यांना समाधान मानावे लागत असल्‍याचे अनिल पवार या फूल विक्रेत्‍याने सांगितले.