महाड नगरपालिकेत अनागोंदी कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाड नगरपालिकेत अनागोंदी कारभार
महाड नगरपालिकेत अनागोंदी कारभार

महाड नगरपालिकेत अनागोंदी कारभार

sakal_logo
By

महाड, ता. ३ (बातमीदार) : पालिकेतील सदस्यांची मुदत संपल्यामुळे काही महिन्यांपासून प्रशासकाकडे महाड नगरपालिकेचा कारभार आहे. परंतु प्रशासनाचा मनमानी आणि अनागोंदी कारभारामुळे शहरातील नागरिक मेटाकुटीला आले आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केला आहे. प्रशासकामार्फत होणाऱ्या या अनागोंदी कारभाराविरोधात त्यांनी दंड थोपटत रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे ही तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

महाड नगरपालिकेला स्वच्छ भारत अभियानांतर्गत सलग तीन वर्षे राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. मात्र, या स्वच्छतेचा आजमितीस पूर्ण बोजवारा उडालेला आहे. शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या घंटागाड्यांना वेळ ठरवून दिलेली आहे; मात्र दिलेल्या वेळेत त्या विभागात जात नाहीत. परिणामी, रस्त्या-रस्त्यावर, गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. याशिवाय, अस्वच्छ रस्ते, तुंबलेली गटारे, शहराच्या विविध भागांतील पथदिवे बंद आहेत. अस्वच्छतेमुळे शहरात डेंगीसह विविध आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरातील बांधकाम परवानग्या किंवा सामान्य नागरिकाला नगरपालिकेकडून आवश्‍यक असणाऱ्या परवानग्या मुदतीत मिळत नाहीत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. मालमत्ता कर आणि अन्य करांच्या वसुलीत महाड नगरपालिकेची कामगिरी सात ते आठ महिन्यांच्या काळात कमालीची ढासळली आहे. त्याचा गंभीर परिणाम नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. प्रशासनावर कुणाचाही अंकुश नसल्याने शहराची अवस्था अत्यंत वाईट होत चालली आहे. आपण आपल्या स्तरावरून याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे. याबाबत महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी महादेव रोडगे यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही