बाजारपेठेत झेंडूचा सडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारपेठेत झेंडूचा सडा
बाजारपेठेत झेंडूचा सडा

बाजारपेठेत झेंडूचा सडा

sakal_logo
By

महाड, ता. ४ (बातमीदार)ः दसऱ्याला देवदेवतांच्या पूजेबरोबरच यंत्रे, उपकरणे, अवजारे, शस्‍त्रांची पूजा केली जात असल्याने झेंडूच्या फुलांसह आपट्याची पाने, तोरणे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. झेंडूला मोठी मागणी असून दर १०० रुपये प्रतिकिलो आहे. बाजारात झेंडूबरोबरच शेवंती, आपट्याची पाने खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसऱ्याला घर, वाहन, नवीन वस्तू खरेदी, व्यवसायाची सुरुवात करण्याला प्राधान्य दिले जाते. याशिवाय सरस्वती पूजन, वह्या-पुस्तकांचे पूजन केले जाते. या पूजेत झेंडूची फुले-हारांना विशेष मान असतो. शिवाय सजावटीतही झेंडूची आवश्‍यकता असल्‍याने ही फुले मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात.
दक्षिण रायगडमधील लहान-मोठ्या बाजारपेठांमधील रस्‍त्‍यांवर ताडपत्री टाकून झेंडूची फुले विक्रीसाठी पसरलेली दिसतात. स्थानिक शेतकऱ्यांकडून कमी पुरवठा होत असल्याने बाजारपेठेत वाई, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, जेजुरी, बारामती, निरा येथून पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूची मोठी आवक झाली आहे. रायगडात कलकत्ता आणि नामधारी अशा दोन प्रकारच्या झेंडूंना मागणी आहे. फुलांची आवक मोठी असली, तरी दर घसरलेले नाहीत.

आपट्याची पाने, तोरणांना मागणी
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने पूजनीय असतात. सोने म्हणून ती वाटली जातात. आपट्याची पाने स्थानिक पातळीवरच उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळाला आहे. दसऱ्याला भाताच्या लोंब्‍या असलेले नवान्न तोरण, झेंडूचे तोरण दारावर लावण्याची प्रथा आहे. नवान्न म्हणजे शेतात तयार झालेल्या भाताच्या नवीन लोंब्या. या लोंब्या व त्यात काही झेंडूची फुले घालून एक गुच्छ तयार केला जातो. हा गुच्छ २५ रुपये; तर जोडी ५० रुपये दराने विकली जात आहे. महाडच्या चौकाचौकात शंभरहून अधिक विक्रेते व महिला फुले, तोरणे, नवान्न विक्रीसाठी आल्‍या आहेत.

.........

दर वर्षी दसऱ्यासाठी आपट्याची पाने व नवान्न विकतो. गावातून झाडावरून ही पाने काढावी लागतात. त्याला मेहनत असते. मागणी असल्याने संध्याकाळपर्यंत पाने शिल्लक राहत नाहीत. नवान्नाला पौर्णिमेपर्यंत मागणी असते.
- वसंत बटावले, विक्रेता

यंदा झेंडूची शेती मोठ्या प्रमाणात बहरली आहे. शिवाय दोन वर्षांनंतर ग्राहकही बाहेर पडल्याने फुलांना मागणी आहे. पाऊस थांबल्याने फुलेही दोन-तीन दिवस ताजीतवानी राहू शकतात.
- विजय माने, विक्रेता