महाडमध्ये नव्या राजकीय वादळाची शक्‍यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमध्ये नव्या राजकीय वादळाची शक्‍यता
महाडमध्ये नव्या राजकीय वादळाची शक्‍यता

महाडमध्ये नव्या राजकीय वादळाची शक्‍यता

sakal_logo
By

महाड, ता. १६ (बातमीदार) ः महाड मतदारसंघामध्ये होत असलेल्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये येथील नेतृत्वाचा नव्याने कस लागणार आहे. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाड मतदारसंघातील महाड, पोलादपूर व माणगाव या तीन तालुक्यांतील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. त्यामुळे नव्या राजकीय वादळाची दिशा या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
महाड विधानसभा मतदारसंघामध्ये महाड, माणगाव व पोलादपूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचे विभाजन झाल्याने शिंदे गट व उद्धव गट प्रथमच आमने-सामने येणार आहेत.
आमदार भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिंदे गटाचे ते प्रतोद असल्याने गोगावले यांच्या मतदारसंघातील या ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आमदार गोगावले यांच्या निवासस्थानाजवळ व ते स्वत: मतदार असलेल्या खरवली या ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना विरोधात सर्व पक्ष महाविकास आघाडी करून एकत्र लढत आहेत.
औद्योगिक क्षेत्रामधील ही महत्त्वाची ग्रामपंचायत असल्याने या निवडणुकीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. २५ वर्षे या ग्रामपंचायतीवर शिवसेना पर्यायाने गोगावले यांचे वर्चस्व राहिले आहे. ते संपुष्टात आणण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. माजी आमदार माणिक जगताप यांच्या निधनानंतर काँग्रेसची धुरा त्यांची मुलगी स्नेहल जगताप व भाऊ हनुमंत जगताप हे सांभाळत आहेत. महाड, माणगाव व पोलादपूर या तालुक्यांतील निवडणुकांमध्ये ते सक्रिय झाले आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. या मतदारसंघात शिवसेना व काँग्रेस अशी लढत विधानसभेला होत असते. त्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टीने आमदार भरत गोगावले, तसेच माणिक जगताप यांचे वारसदार म्हणून नवीन नेतृत्वाला वाव मिळण्यासाठी या निवडणुका राजकीय भवितव्याच्या संकेत देणाऱ्‍या ठरणार आहेत.
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वजरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत; तर माणगाव तालुक्यामध्ये पन्हाळघर खुर्द, पन्हाळगड बुद्रुक व देगाव या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. शिवसेना फुटीनंतर शिंदे गट व उद्धव गटाला आपली ताकद स्वतंत्रपणे अनुभवण्यासाठी या निवडणुका रंगीत तालीम ठरणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आपली ताकद तपासण्यासाठी या निवडणुकांकडे पाहावे लागत आहे. आता महाड मतदारसंघ गोगावले यांच्यामुळे राजकीयदृष्ट्या राज्याच्या नकाशावर आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात होणाऱ्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या ग्रामपंचायतींत थेट सरपंच निवडणूक होत आहे.
सोमवारी निवडणूक निकालानंतर कोणते राजकीय नेतृत्व नव्याने उदयाला येते, अथवा कोणाची ताकद टिकून आहे याची प्रचिती येणार आहे. शिवसेनेचे मतदार कोणती भूमिका घेतात, हे देखील यातून स्पष्ट होणार असल्याने अनेक ग्रामपंचायती महत्त्वाच्या असल्याने विधानसभेतील संभाव्य उमेदवार याकडे लक्ष ठेवून आहेत.
.............
महाडमधील ग्रामपंचायती व मतदार

खरवली २७३८
देगाव २२५९
तुर्भे खुर्द ८२२
तुर्भे बुद्रुक ७००
तुर्भे खोंडा ३०५
वजरवाडी ७६१
पन्हाळघर खुर्द ५५२
पन्हाळगड बुद्रुक ८६१

महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुका लढतोय. मतदारांचा सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आम्हाला विजयाची खात्री आहे.
- हनुमंत जगताप, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस

चार नव्हे पाच पक्ष जरी एकत्र आले तरी बाळासाहेबांचा शिवसैनिक आमच्या पाठीशी आहे. खरवली ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा आपला प्रयत्न होता; परंतु विरोधकांनी तो मान्य केला नाही.
- भरत गोगावले, आमदार, शिंदे गट