स्नेहल जगताप यांच्या मातोश्री भेटीने चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्नेहल जगताप यांच्या मातोश्री भेटीने चर्चांना उधाण
स्नेहल जगताप यांच्या मातोश्री भेटीने चर्चांना उधाण

स्नेहल जगताप यांच्या मातोश्री भेटीने चर्चांना उधाण

sakal_logo
By

महाड, ता. २३ (बातमीदार) : माजी आमदार माणिक जगताप यांची कन्या आणि महाडचे नगराध्यक्ष पाच वर्षे सांभाळणाऱ्या स्नेहल जगताप यांनी नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने रायगडच्या राजकीय वर्तुळामध्ये ऐन दिवाळीत बॉम्ब पडला आहे. महाडचा मतदार संघ हा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असल्याने त्यांची राजकीय कोंडी करण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी, महाड मतदार संघामधून तीन वेळा विजय मिळवला. यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने व त्यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड झाली होती. शिंदे गटातील आमदारांना कोणत्याही स्थितीत पराभूत करण्याची रणनीती विरोधकांकडून सुरू झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या स्नेहल जगताप कन्या असून हनुमंत जगताप हे भाऊ आहेत. माणिक जगताप यांच्या निधनानंतर या दोघांकडून काँग्रेसची धुरा सांभाळली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत खरवली ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचा सरपंच विजयी करत आमदार भरत गोगावले यांना नुकताच धक्का दिला. आता हेच धक्कातंत्र विधानसभा निवडणूक, महाड नगरपालिका निवडणूक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अमलात आणण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भरत गोगावले यांचे महाड मतदारसंघात मोठे प्राबल्य असल्याने त्यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्याने महाविकास आघाडीकडून आता गोगावलेंची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्नेहल जगताप यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेटीचे हेच सूतोवाच आहेत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत हनुमंत जगताप व सुभाष देसाई होते. स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात की महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाड मतदार संघाची पुढील रणनीती ठरवतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. स्‍नेहल यांनी महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा कारभार पाच वर्षे यशस्वीपणे सांभाळला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसच्या माध्यमातून त्‍या निवडणूक लढवतात की अन्य पर्याय शोधले जातात, यावर महाडचे राजकारणाची दिशा ठरण्याची शक्‍यता आहे.

महाडच्या राजकारणात फेरबदल!
आमदार भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटाचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे शिंदे यांच्यासोबतच उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात गोगावले यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र येत गोगावले यांच्या पराभवाची रणनीती आखत आहेत. मागील निवडणुकीत गोगावले यांनी माणिक जगताप यांचा २५ हजार मतांनी पराभव केला होता. स्नेहल जगताप यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे जरी सांगितले असले तरी येणाऱ्या काळामध्ये महाडच्या राजकारणाची दिशा बदलणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

महाड ः स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली