दिवाळी पहाटसाठी रस्‍ते फुलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी पहाटसाठी रस्‍ते फुलले
दिवाळी पहाटसाठी रस्‍ते फुलले

दिवाळी पहाटसाठी रस्‍ते फुलले

sakal_logo
By

महाड, ता. २४ (बातमीदार) : कोरोना प्रादुर्भाव आणि त्यानंतर आलेला महापुरामुळे दिवाळीची पहिल्‍या पहाटे घराबाहेर मनसोक्त फिरण्याची महाडकरांच्या शेकडो वर्षांच्या परंपरेला काहीसा खंड पडला होता. परंतु या वर्षी तितक्याच उत्साहाने महाडकरांनी पारंपरिक वेशात सोमवारी पहाटे घराबाहेर पडून मित्रमंडळी-आप्तस्‍वकियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई-गोवा महामार्गसह अनेक रस्त्यांवर महाडकरांची व वाहनांची गर्दी दिसत होती.
रस्‍त्‍यावर सुरू असलेली फटाक्‍यांची आतषबाजी, सेल्फी काढण्याची क्रेझ, एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थांवरचा ताव मारत महाडकरांनी दिवाळी पहाट साजरी केली.
महाडमध्ये दरवर्षी दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी होते. पहाटे अभ्यंगस्नान झाले की महाडकर नवनवीन पोशाख परिधान करून घराबाहेर पडतात. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी होते. मुंबई-गोवा महामार्ग तसेच सर्व्हिस रोड शहरापासून विसावा कॉर्नरपर्यंतचा रस्ता सोमवारी पहाटे गर्दीने फुलून गेला होता. तरुणाई, बच्चेकंपनी, नवदाम्पत्य आणि ज्‍येष्ठांचा लवाजमा सारेच उत्साहात वावरत होते. शेडावकडे जाणारा रस्ता, दादली, नातेखिंड, शिरगाव, लाडवली या रस्त्यांवर देखील गर्दी झाली होती. दिवाळीचे तीन-चार दिवस महाडमधील रस्‍त्‍यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्‍या दिसतात.

खवय्यांची गर्दी
दिवाळीचा फराळ खाण्यापेक्षा दिवाळीत हॉटेलमधील पदार्थांवर ताव मारण्याची महाडकरांची खासियत आहे. वडापाव, मिसळ, कटलेट, छोले भटोरे, पॅटिस, मसाला डोसा, पाव भाजी, पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी आदी पदार्थांचा खमंग वास हॉटेल परिसरात दरवळत होता. याठिकाणी खवय्यांनी गर्दी उसळली होती.

महाड ः शहरातील रस्‍ते सोमवारी सकाळी गर्दीने फुलले होते.