कामगाराच्या मृत्‍यूनंतर कंपनीवर दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगाराच्या मृत्‍यूनंतर कंपनीवर दगडफेक
कामगाराच्या मृत्‍यूनंतर कंपनीवर दगडफेक

कामगाराच्या मृत्‍यूनंतर कंपनीवर दगडफेक

sakal_logo
By

महाड, ता. १६ (बातमीदार) ः तालुक्‍यातील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत सोमवारी रात्री झालेल्या वायू गळतीमध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी मृत कामगाराला न्याय देण्याची मागणी करत कंपनीवर दगडफेक केली. या घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रायगड जिल्ह्यात कारखान्यातील अपघाताचे प्रमाण वाढत असून त्यात प्रसोल केमिकल या कारखान्यातील अपघाताचीही भर पडली आहे. महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील आमशेत गावाजवळ प्रसोल केमिकल हा रासायनिक कारखाना आहे. या कारखान्यात सोमवारी रात्री झालेल्‍या विषारी वायुगळतीमुळे जितेंद्र भागुराम आडे ( ४०, रा.वाळण) याचा मृत्‍यू झाला तर अन्य एक कामगार अस्‍वस्‍थ असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रसोल केमिकल कारखान्यात सोमवारी रात्री फिनिश गोदामाजवळील अनलोडिंग विभागात कॉस्टिक लिक्विड खाली करण्याचे काम जितेंद्र आडेसह मिलिंद मोरे, प्रशांत किंकले हे कामगार करीत होते. वायू गळती झाल्‍याने आडे बेशुद्ध झाले. त्‍यांना आधी खासगी रुग्‍णालयात त्‍यानंतर महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याठिकाणी डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. तर प्रशांत किंकले (स्टोअर इन्चार्ज), मिलिंद मोरे या दोघांचीही प्रकृती सध्या स्‍थिर आहे.
आडे वाळण गावातील असल्याने संतप्त ग्रामस्‍थांनी प्रवेशद्वारावर जमा होत कंपनीच्या फलकाची तोडफोड केली तसेच सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयावर दगडफेक केली. यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला. कामगाराला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्‍थ शशिकांत कालगुडे यांनी मांडली.

परिस्‍थिती नियंत्रणात
महाड औद्योगिक पोलिस आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचे प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणली. महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांनी तात्काळ घटनास्‍थळी भेट देत कंपनीचे व्यवस्थापक संदेश महागावरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला, मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान परिसरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले.

कारखाना नेहमी वादात
महाडमधील आमशेत गावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याने औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल केमिकल्स हा कारखाना गतवर्षी बंद करण्यात आला होता. पिण्याचे पाणी प्रदूषित केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर कारवाई केली होती, परंतु त्‍यानंतरही कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला होता.