थोडीशी वाट वाकडी करुन आवर्जुन पाहावे असे देवमाशांचे वाळणकुंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थोडीशी वाट वाकडी करुन आवर्जुन पाहावे असे देवमाशांचे वाळणकुंड
थोडीशी वाट वाकडी करुन आवर्जुन पाहावे असे देवमाशांचे वाळणकुंड

थोडीशी वाट वाकडी करुन आवर्जुन पाहावे असे देवमाशांचे वाळणकुंड

sakal_logo
By

‘देवाच्या माशां’चे वाळणकुंड
पर्यटकांची वर्दळ

सुनील पाटकर, महाड

कोकणात निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळतात, तर काहींना दैवी चमत्काराची जोड असल्‍याचे बोलले जाते. त्यापैकीच एक म्हणजे महाड तालुक्यातील ‘वाळणकुंड’ हे ठिकाण. काळ नदीत रांजण खळग्यांमुळे तयार झालेला बारमाही पाणी असलेला डोह आणि डोहातील आकर्षक देवाचे मासे. नदीवरील लोखंडी झुलता पूल आणि पूल ओलांडताच नदीकिनारी वसलेले माता वरदायिनीचे मंदिर. महाडमध्ये पर्यटनासाठी आल्‍यावर थोडीशी वाट वाकडी करून ‘वाळणकुंड’ येथे आल्यास पर्यटक, भाविक व लहान मुलांना वेगळा अनुभव घेता येतो.

पावसाळ्यात काळ नदीच्या पाण्याचा फारच वेग असतो. ज्या ठिकाणावरून नदी उगम पावते, त्या ठिकाणचा सगळा भाग खडकाळ आहे. पाणी प्रचंड वेगाने वाहत असल्‍याने वाटेत दगडाचा भाग कापला जातो. अशाच खडकाळ भागातून तयार झालेला मोठा डोह म्हणजेच ‘वाळणकुंड’. याला वाळणकोंडी असेही म्हणतात.
महाड-वारंगी रस्त्यावर महाडपासून २० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. वाळणकोंडीचा हा नैसर्गिक डोह ३० मीटर लांबीचा, १० मीटर रुंदीचा व बारमाही जलमय असा आहे. डोहात विशिष्ट ठिकाणी लहान-मोठ्या आकाराचे मासे आहेत. खास माशांसाठी प्रसिद्ध असलेल्या वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत.
डोहातील पाणी कधीही आटत नाही. त्‍यामुळे देवासे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रवाहातही माशांचे अस्तित्व येथेच असते. डोहात खोबरे, चुरमुरे पदार्थ टाकले की ते खाण्यासाठी प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात. माशांचे एकूण सात थर खालून वर येत असतात. माशांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते. लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो.

दुर्मिळ माशांच्या प्रजाती
वाळणकुंड नदीवर लोखंडी झुलता पूल बांधला आहे. त्यावर उभे राहून कुंडातील मासे पाहता येतात. हे देवाचे मासे असल्‍याचे मानले जात असल्‍याने त्‍यांना मारले अथवा पकडले जात नाही. वाळणकोंडी येथे आढळणारे देवमासे हिमालयात आढळणाऱ्या दुर्मिळ गोल्डन माहसीर नावाच्या माशांच्या प्रजातीमधील आहेत. ते या ठिकाणी कसे आले, हा कुतूहलाचा विषय आहे. भारतात केवळ वाळणकुंड व कर्नाटक या दोन ठिकाणी हे मासे आढळतात.

पर्यटकांची वर्दळ
नदीकाठी वरदायिनी मातेचे जागरूक देवस्‍थान आहे. पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफुलांचे मळेच फुललेले असतात. ही फुले पाहताना, ‘जाईन विचारीत रानफुला’ हे गाणे आठवल्याशिवाय राहत नाही. थंडीच्या हंगामात रस्त्यावर बागडणारी रंगीबेरंगी, सुंदर फुलपाखरांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह पर्यटकांना होतो. वाळणकोंडीला थेट वाहन जात असल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासून पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. येथून जवळच रायगड, शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते. ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.

महाड-वाळणकुंडाजवळील झुलता पूल आणि वरदायिनी मातेचे मंदिर.