महाडमध्ये सरपंचासह ३५ जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमध्ये सरपंचासह ३५ जणांवर गुन्हा
महाडमध्ये सरपंचासह ३५ जणांवर गुन्हा

महाडमध्ये सरपंचासह ३५ जणांवर गुन्हा

sakal_logo
By

महाड, ता. २० (बातमीदार) : औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या दुरुस्ती कामात अडथळा आणल्‍याप्रकरणी आणि त्‍यासाठी बेकायदेशीर जमाव केल्‍याप्रकरणी शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे, माजी सरपंच व इतर ३५ जणांविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरगाव नाका येथे १४ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता, तर १५ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता ही घटना घडली. १४ नोव्हेंबरला सायंकाळी महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी एमआयडीसी ते ओवळे ही वाहिनी शिरगाव गावाजवळ फुटल्याने शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शिरगाव नाका येथे जमून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला. त्यानंतर ही वाहिनी दुरुस्ती करण्याचे काम एमआयडीसीकडून करण्यात येत असताना शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी ग्रामस्थांसह जमून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत वाहिनीचे काम करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पुन्हा पंधरा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता वाहिनी दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या एमआयडीसीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला वाहिनी दुरुस्तीचे काम करू दिले नाही. त्यामुळे सोमनाथ ओझर्डे, तसेच माजी सरपंच व इतर ३० ते ३५ ग्रामस्थांविरोधात बेकायदेशीररित्‍या जमाव जमवून वाहिनी दुरुस्तीच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एमआयडीसीकडून महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

वाहिनी फोडल्‍याची तक्रारीत उल्‍लेख
एमआयडीसीचे उपअभियंता दीपक बोबडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सोमनाथ ओझर्डे व इतर ३० ते ३५ जणांविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये सांडपाण्याची ही वाहिनी कोणीतरी फोडली असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
..........