कोंडीवतेमध्ये गरम पाण्याचे कुंड, बारवाचे संवर्धन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडीवतेमध्ये गरम पाण्याचे कुंड, बारवाचे संवर्धन
कोंडीवतेमध्ये गरम पाण्याचे कुंड, बारवाचे संवर्धन

कोंडीवतेमध्ये गरम पाण्याचे कुंड, बारवाचे संवर्धन

sakal_logo
By

महाड, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्रात गरम पाण्याची कुंडे व बारव अनेक ठिकाणी आढळतात. यातील बहुतांशी ठिकाणे संवर्धनाअभावी काळाच्या पडद्याआड जात आहेत. जागतिक वारसा सप्ताहनिमित्ताने २२ नोव्हेंबरला महाड तालुक्यातील कोंडीवते येथील गरम पाण्याचे कुंड, बारव येथे साद सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे संवर्धन मोहीम घेण्यात आली.

गरम पाण्याचे कुंड असलेली विहिरीलगत उगवलेले गवत आणि झाडेझुडपे साफ करण्यात आली. बारव असणाऱ्या ठिकाणी साचलेला गाळ काढण्यात आला. संरक्षक भिंत, तसेच रेलिंगच्‍या दुरुस्‍तीबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आला. मोहिमेत सौरभ म्हस्के, नवनीत चौधरी, केतन फुलपगारे, आदेश वाडेकर, सिद्धेश जाधव, निखिल साळवी, संतोष जाधव यांनी श्रमदान केले. तसेच अरुण कळंबे, श्रावण शिंदे, सुधीर शिंदे, किरण दिघे, किसन शेलार, रोशन जमदाडे या ग्रामस्थांनी आणि मंदिर समितीने मोहीम यशस्वी करण्यात सहकार्य केले.
सद्यस्थितीत कोंडीवतेकडे जाण्यासाठी फक्त पायवाट आहे, वाहने जाऊ शकतील, असा रस्ता अस्तित्वात नाही. त्यामुळे राजेवाडी ते गावदेवी मंदिर कोंडीवते असा अर्धा किमी रस्त्‍यासाठी प्रयत्‍न करण्याची मागणी ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे.


असे आहे कुंड आणि बारव
तालुक्यातील सव येथील गरम पाण्याचे झरे असलेले कुंड प्रसिद्ध आहेच, याचबरोबर महाडपासून ५ किमी अंतरावर कोंडीवते गावात ग्रामदैवताच्या आवारात दक्षिणेला चिरेबंदी बांधकामातील अपरिचित कुंडे आहेत. हे कुंड म्हणजे एक छोटी चिरेबंदी विहीरच आहे. मंदिराच्या समोर चौकोनाकृती गरम पाण्याच्या कुंडाची लांबी ५ फूट, रुंदी ४ फूट आणि खोली २० फूट खोली आहे. गरम पाण्याचे झरे सतत प्रवाहित आणि मोकळे राहावेत म्हणून तळाला शिसव लाकडाच्या फळ्या लावल्या आहेत.

बारवात साचला गाळ
गावदेवी मंदिरासमोर डाव्या बाजूला असणारे चिरेबंदी बांधकाम ही एक चौकोनी आकारातील लहान बारव आहे. बारवेची लांबी ५ फूट आणि रुंदी ४ फूट, तर खोली ८ फूट आहे. खाली उतरायला ४ पायऱ्या आहेत. बारवेत गाळ भरला आहे. त्यामुळे अचूक अंदाज बांधणे कठीण आहे. गरम पाण्याची मुख्य विहीर ते बारव हे अंतर १२ फूट आहे. ही दोन्ही कुंडे धातूच्या पाईपने आतून जोडलेली आहेत. गरम पाण्यात आंघोळ करण्यासाठी ५ फूट खोलीपर्यंत पाणी वापरायला उपलब्ध व्हावे, यासाठी ही योजना केली असल्याचे दिसून येते. या दोन्ही कुंडांना जोडणाऱ्या मधल्या भागात एक चौकोनी खड्डा आहे. वरून खाली पाणी सुरळीत येत रहावे आणि प्रवाह खंडित झाल्यास त्याची साफसफाई करता यावी म्हणून हा खड्डा ठेवला असावा, असा अंदाज आहे.


सावित्री नदीला येणाऱ्या महापुरात कुंडात गाळ भरला होता. त्यामुळे हे गरम पाण्याचे कुंड लुप्त होण्याच्या मार्गावर होते. म्हणूनच संस्थेने ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदान करून हा पुरातन ठेवा संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
- केतन फुलपगारे, साद सह्याद्री प्रतिष्ठान

महाड - कोंडीवतेमधील गरम पाण्याचे कुंड आणि बारवाची साफसफाई करण्यात आली.