
परांजपे विद्यालय गिरवणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
महाड, ता. १ (बातमीदार) : आपत्ती काळामध्ये सतर्क कसे राहावे, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३४ शाळा-महाविद्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाडमधील विनायक हरी परांजपे या शाळेची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, संयुक्त राष्ट्र सुधारणा कार्यक्रम व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पुढाकाराने रिका इंडिया या संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३४ शाळा-महाविद्यालयांमध्ये नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्या मदतीने मॉकड्रिल होणार आहे. हे मॉकड्रिल नागरी संरक्षण दल व होमगार्ड विभागातील अधिकारी त्या-त्या शाळा व महाविद्यालयातील संबंधित शिक्षकांशी समन्वय साधून १४ डिसेंबरपर्यंत पार पडणार आहेत. या मॉक ड्रिलमध्ये विद्यार्थ्यांना धोक्याची सूचना, आग विमोचन, स्थलांतर याची प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत. या मॉकड्रिलसाठी महाड शहरातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विनायक हरी परांजपे शाळेची निवड झाली आहे. या मॉकड्रिलमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्तीमध्ये धैर्याने संकटावर मात करता येईल.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे बहुमोल व उपयोगी प्राथमिक प्रशिक्षण या मॉकड्रिलच्या माध्यमातून मिळेल.
- राजेश्वरी कोरी, समादेशक व वरिष्ठ प्रशासिक अधिकारी