राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा!
राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा!

राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा!

sakal_logo
By

महाड, ता. ३ (बातमीदार) : छत्रपती शिवरायांचे नाव गर्वाने घेता; परंतु आपला स्वार्थ साधल्यावर त्यांचा अवमान होत असतानाही कोणतीही ठाम भूमिका घेण्याचे धारिष्ट्य का दाखवले जात नाही, अशी घणाघाती टीका छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय पक्षांवर केली. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई झाली नाही तर आझाद मैदानावर मोठे आंदोलन केले जाईल, राज्यपालांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उदयनराजे यांनी शिवसन्मानासाठी ‘चलो रायगड’ अशी हाक दिल्यानंतर आज रायगडावरील मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीवरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले आहेत. शिवरायांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलो असतो तर बरे झाले असते, अशी भावनाही उदयनराजे भोसले यांनी या वेळी व्यक्त केली. ‘प्रोटोकॉल’च्या नावाखाली राज्यपालांना पाठीशी घालू नका. जी चूक ती चूकच, अशी चूक करणाऱ्यांना पाठीशी घालणारेदेखील दोषी आहेत. राजेशाही असती तर अशी वक्तव्ये करणाऱ्यांचा कडेलोट केला गेला असता, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

छत्रपतींचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे. असा सन्मान न करणारे राज्यपाल तसेच इतर कोणालाही त्यांच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. शिवरायांनी निर्माण केलेले राज्य हे शिवरायांचे राज्य म्हणून ओळखले गेले नाही; तर ते रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. शिवरायांनी कधीच स्वार्थाचा विचार केला नाही; परंतु आता सर्वच राजकीय पक्ष स्वार्थी झाले आहेत. महाराजांचा अपमान होतो तेव्हा कोणीही ठाम भूमिका घेत नाही. त्यामुळे गप्प बसणारेदेखील दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला.

उदयनराजेंचे जल्लोषात स्वागत
१) खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘चलो रायगड’ची हाक दिल्यानंतर ते आज रायगडावर दाखल झाले. येथे त्यांचे ढोल-ताशा व तुतारीच्या ललकारीत व हरहर महादेवच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी त्यांनी शिरकाई देवीचे तसेच जगदीश्वराचे दर्शन घेतले व शिवसमाधीस्थळी नतमस्तकही झाले. होळीच्या माळावरील तसेच मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी रायगडावर त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात शिवप्रेमीही दाखल झाले होते.
२) रायगडावर या शिवसन्मान मेळाव्याबाबची पत्रकेही वाटण्यात आली. रायगडावर दाखल होण्यापूर्वी महाडमध्ये उदयनराजे यांचे ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. उदयनराजे यांनी आपल्या समर्थकांसह पाचाड येथे राजमाता जिजाऊ समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी महाबळेश्वर वाडा, पोलादपूर तसेच महाड येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या सर्व दौऱ्यात ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्ततेने स्वागत करण्यात आले.