रखडलेल्या चौपदरीकरणाला हिरवा कंदील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रखडलेल्या चौपदरीकरणाला हिरवा कंदील
रखडलेल्या चौपदरीकरणाला हिरवा कंदील

रखडलेल्या चौपदरीकरणाला हिरवा कंदील

sakal_logo
By

महाड, ता. ७ (बातमीदार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम जवळपास पूर्णत्वास आले आहे; मात्र वन विभागाच्या परवानगीअभावी सहा किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे; मात्र आता वन विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्याने हे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे इंदापूर ते कशेडी हे दुसऱ्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्णत्वास येत आहे. या सुमारे ६५ किलोमीटरच्या महामार्गामध्ये वन विभागाच्या जमिनी असल्याने परवानगी मिळण्यास अडचण येत होती. त्यामुळे सुमारे सहा किलोमीटर अंतराचे काम पूर्णपणे थांबले होते. दुसऱ्या टप्प्याच्या कामामध्ये इंदापूर ते कशेडी यादरम्यान माणगाव तालुक्यात ३.१५ किमी आणि महाड तालुक्यात २.९५ किमी अंतरामध्ये वनखात्याची एकूण १८.४४ हेक्टर जमीन आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यात कशेणे, साळे, कलमजे, खर्डी बुद्रूक, उतेखोल, भादाव, ढाळघर, जावळी, गारळ, मुंगवली, लोणेरे आणि वडपाले या गावांमध्ये ३.१५ किमी काम शिल्लक आहे. महाड तालुक्यातील वीर ते दासगाव या २.९५ किमी अंतराचे चौपदरीकरण काम वन खात्याच्या परवानगी नसल्यामुळे रखडलेले होते.

१५.१९ कोटी रुपये जमा
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून २०१८ मध्ये वन खात्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे हे प्रस्ताव परत येत होते. त्यानंतर काही अटी-शर्तीवर १५ कोटी १९ लाख रुपये भरून या ठिकाणच्या कामाला परवानगी देण्याचे निश्चय झाले. त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रस्ताव तयार करून वनखात्याकडे पाठवण्यात आला. मंजुरी मिळताच २ ऑक्टोबर २०२२ मध्ये महामार्ग विभागाकडून वन खात्याला निर्धारित रक्कम देण्यात आली. महामार्ग विभागाने वृक्ष लागवड करणे आणि वन संवर्धनाकरिता ही रक्कम भरून घेतली आहे. महामार्ग विभागाला नोव्हेंबर २०२२ मध्ये अखेर कामाची परवानगी मिळाली.

डिसेंबर २०२३ अखेर काम पूर्ण
वीर ते दासगाव या टप्प्यामध्ये सर्व्हे सुरू असून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार असून मार्च २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. माणगाव तालुक्यातील कामदेखील लवकर सुरू केले जाणार असून डिसेंबर २०२३ अखेर हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांकडून देण्यात आली आहे.

वन विभागाची परवानगी मिळाली असल्याने वीर ते दासगाव भागात सर्व्हे सुरू आहे. काही दिवसांतच माणगाव भागातील सर्व्हे करण्यात येणार आहे. लवकरच या चौपदरीकरणाच्या अडकलेल्या कामांना सुरुवात होणार आहे.
- आकांक्षा मेश्राम, सहायक कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग