दांडगा लोकसंपर्कामुळेच निवडणुकीत बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दांडगा लोकसंपर्कामुळेच निवडणुकीत बाजी
दांडगा लोकसंपर्कामुळेच निवडणुकीत बाजी

दांडगा लोकसंपर्कामुळेच निवडणुकीत बाजी

sakal_logo
By

वार्तापत्र

सुनील पाटकर ः सकाळ वृत्तसेवा

महाड, ता. २२ : दांडगा लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आणि तीन वेळा विधानसभेत मिळालेला विजयाचा अनुभव या जोरावर महाड तालुक्यामध्ये आमदार भरत गोगावले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यात यश मिळवले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गट हे सर्व पक्ष एकत्रित असतानाही, शिंदे गटाने मिळवलेले यश महाडच्या राजकारणात महत्त्वाचे असून त्‍यामुळे आमदार गोगावले यांचे मतदारसंघातील पारडे अधिक जड झाले आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर, आमदार भरत गोगावले यांचा शिंदे गटात सक्रिय सहभाग होता. एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असल्याने गोगावले यांचा पराभव करण्यासाठी सर्वच विरोधक एकत्र आले आहेत. महाड मतदारसंघाचा विचार करता हा मतदारसंघ प्रामुख्याने शिवसेनेचा बालेकिल्‍ला असून काँग्रेस विरोधी राहिला आहे. तरीही मधल्या काळामध्ये काँग्रेसचे माणिक जगताप यांनी महाड मतदारसंघामध्ये एकदा प्रतिनिधित्व करून विरोधकांना आव्हान दिले होते; परंतु जगताप यांच्या निधनानंतर काँग्रेसकडे सद्यस्थितीत प्रबळ नेतृत्वाचा अभाव आहे.
आमदार गोगावले यांनी तीन वेळा महाड मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केले आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या माध्यमातून त्यांनी तळागाळाशी संपर्क ठेवला आहे. प्रत्येक गावामध्ये असणारा दांडगा जनसंपर्क हेच त्‍यांच्या यशाचे मुख्य गमक आहे. आमदार गोगावले यांचे नेतृत्व संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रितपणे यापूर्वी खरवली ग्रामपंचायत निवडणूक लढवली. यामध्ये ग्रामपंचायत बहुमत मिळाले तरी सरपंचपद न मिळाल्याने आमदार गोगावले यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे मनोबल वाढले आणि त्यांनी तालुक्यातील बहुसंख्य निवडणुका शिंदे गटाविरोधात एकत्रित लढण्याचे ठरविले; परंतु गोगावले यांचा व्यक्तिगत संपर्क आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व गावोगावी केलेल्‍या अनेक विकासकामांच्या जोरावर त्‍यांनी अनेक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवला.

काँग्रेसमध्ये प्रभावी नेतृत्‍वाचा अभाव
माणिक जगताप यांच्या नेतृत्वाचा अभाव महाविकास आघाडीला जाणवला. मागील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडे एवढ्याच जागा होत्या. त्यामुळे आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस अथवा उद्धव ठाकरे गटाचा फारसा फायदा काँग्रेसला या निवडणुकीत झाला नाही. उलट पक्षी सवाणे, नडगाव व बालेकिल्ला असलेली कांबळे या महाड औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती महाविकास आघाडीला पर्यायाने काँग्रेसला गमवाव्या लागल्या.

जनसंपर्कातील नेता निवडला
महाड मतदारसंघात आमदार भारत गोगावले यांना प्रमुख विरोधक नसणे ही त्यांची एक जमेची बाजू आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरही अनेक कार्यकर्ते, मतदार व बहुसंख्य पदाधिकारी गोगावले यांच्या पाठीशी राहिले आहेत. ग्रामीण भागातील जनतेने विकासाला, जनसंपर्कात असलेल्‍या लोकप्रतिनिधीला निवडले, हेच या विजयातून पुढे आले आहे.
............