महाडमध्ये अभिवाचन महोत्सवाची प्राथमिक फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमध्ये अभिवाचन महोत्सवाची प्राथमिक फेरी
महाडमध्ये अभिवाचन महोत्सवाची प्राथमिक फेरी

महाडमध्ये अभिवाचन महोत्सवाची प्राथमिक फेरी

sakal_logo
By

महाड, ता. २७ (बातमीदार) : रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव ही कलासंस्था १९ वर्षांपासून पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव हा स्पर्धात्मक उपक्रम घेत असते. यंदा या स्पर्धेचे विसावे वर्ष असून, यामध्ये महाराष्ट्रात २० ठिकाणी प्राथमिक फेरी होणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी होणारी प्राथमिक फेरी २२ जानेवारीला महाड येथे होणार असल्याने स्पर्धकांनी त्‍याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील स्पर्धक संघांसाठी प्राथमिक फेरी मुंबई, कल्याण, महाड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मिरज / सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, लातूर, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी जानेवारी महिन्यात होणार आहे. या स्पर्धेमध्ये दोन ते पाच कलाकारांना कुठल्याही साहित्य प्रकाराचे २५/३० मिनिटांचे साहित्य अभिवाचन करता येईल. यामध्ये कथा, कविता, आत्मवृत्त, वैचारिक लेख, प्रवास वर्णन; तसेच संमिश्र साहित्य कृतीचे अभिवाचन, एका विषयाला धरून नाट्यात्मक अनुभूती देणारे अभिवाचन सादर करायचे आहे. मात्र, नाटक किंवा एकांकिका सादर करता येणार नाही. प्राथमिक फेरीत आलेल्या स्पर्धक संख्येनुसार अंतिम फेरीत एक किंवा दोन संघ जातील.
परदेश आणि परराज्यातील स्पर्धक संघांना व्हिडीओद्वारे अभिवाचन सादर करता येईल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होणारी प्राथमिक फेरी २२ जानेवारीला महाड येथे वि. ह. परांजपे विद्यामंदिर येथे सकाळी ९ ते सायं ६ पर्यंत होणार आहे. यासाठी ९८८१४७९२१४ येथे संपर्क साधावा.

अंतिम फेरीचे स्वरूप
अंतिम फेरी २४, २५ व २६ फेब्रुवारीला चाळीसगाव येथे होणार आहे. अंतिम फेरीत आलेल्या स्पर्धक संघाला प्रवास खर्च, राहण्या-जेवण्याची सोय रंगगंधतर्फे केली जाईल. या स्पर्धेमध्ये सुमारे ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी नव्याने लिहिलेल्या संहिता अंतिम फेरीत कमीत कमी तीन आल्यास सर्वोत्कृष्ट संहिता लेखनाचे पारितोषिक म्हणून लेखकाला एक हजार व प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.