
नववर्षांच्या डायऱ्यांची मागणी घटली
महाड, ता. २९ (बातमीदार)ः नवीन वर्षाचे स्वागत होऊ लागले की विविध दिनदर्शिका आणि दैनंदिनी (डायरी) बाजारात विक्रीसाठी येतात; परंतु वाढती महागाई, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने डायरी घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी या व्यवसायावर संकट आले असून व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. डायरीची घटलेली मागणी आणि वाढत्या किमतींमुळे दुकानदारांनीही डायऱ्या मागवणे कमी केले आहे.
नवीन वर्षात आवडत्या व्यक्तीला अनेक जण डायरी भेट देतात; तर ब्रँड किंवा नाव असलेल्या छापील डायऱ्या कंपन्या किंवा व्यावसायिक आपल्या ग्राहकांना भेट देतात. या डायरीत अनेक महत्त्वपूर्ण नोंदी, वर्षभरातील घडामोडी, चांगले-वाईट अनुभवांची नोंद केली जाते; तर काहींना दिवसाचे नियोजन, खर्च, रोजच्या घटनांची नोंद करण्याची सवय असते. अनेक जण वर्षानुवर्षे ही आवड जपतात. त्यामुळे लिहिण्याची आवडही निर्माण होते.
अनेक मोठ्या व्यक्तींच्या रोजनिशीतून पुस्तकांची निर्मितीही झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मोबाईल युगामुळे डायरी मागे पडत आहे. यामुळे ग्राहकांकडून मागणी कमी झाली आहे.
विविध कंपन्यांमधील अधिकारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच डायरीचा वापर करतात; परंतु आता स्मार्टफोनवर रिमाइंडर, भेटीची वेळ, तसेच इतर महत्त्वाच्या नोंदी पटकन होत असल्याने डायरी भेट देण्याची परंपरा हळूहळू कमी होत चालली आहे.
दुसरीकडे कामगार खर्च, तसेच युद्धामुळे कागद व उत्पादन खर्चात झालेल्या वाढीची झळही डायरी विक्रीला बसली आहे. काळाच्या ओघात डायरीची जागा मोबाईलने घेतली आहे. मोबाईलमधील काही ॲपचा वापर डायरीप्रमाणे करता येतो. यामुळे अनेकांनी डायरी लिखाणाकडे पाठ फिरवली आहे.
पैसे गुंतून राहतात
काही कंपन्या, पतसंस्था या डायऱ्या भेट म्हणून देत होत्या, मात्र त्याचे प्रमाणही कमी झाले आहे. डायरी मागवून त्या संपल्या नाहीत तर जानेवारीनंतर त्या डायऱ्या पडून राहतात. यामुळे पैसे गुंतून राहत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
बाजारात ६० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत डायऱ्या उपलब्ध आहेत. काही वर्षांत डायरीची मागणी ७० टक्के घटल्याने विक्रेत्यांकडून डायऱ्या मोजक्याच मागवल्या जातात.
- प्रसाद मापारा, व्यापारी
...............