
महाडमध्ये उपसरपंचपदासाठी रस्सीखेच
महाड, ता. २८ (बातमीदार) : निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या महाड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदासाठी नवीन वर्षात दोन जानेवारीला निवडणुका होत असून आता या पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान झाले. यापैकी २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर तीन ग्रामपंचायतींमध्ये काही प्रभागांकरता निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवड झाल्याने आता नवनिर्वाचित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचांची निवड होणार आहे. त्यामुळे उपसरपंच निवडीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
काही ठिकाणी सरपंचपदासाठी सक्षम उमेदवार नसल्याने उपसरपंच कामकाज पाहतात. त्यामुळे तुल्यबळ उपसरपंच देण्याकडे राजकीय पक्षांनी विशेष लक्ष दिले आहेत. तालुक्यातील फाळकेवाडी व कुंबळे या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षित प्रवर्गाचा सरपंच उमेदवार उपलब्ध न झाल्याने दोन्ही पदे रिक्त होती. या ठिकाणी आता उपसरपंच पदालाच महत्त्व येणार आहे. २ जानेवारी २०२३ ला काही ठिकाणी सकाळी अकरा वाजता, तर काही ठिकाणी दुपारी दोन वाजता निवड होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करणे, अर्ज मागे घेणे व वेळप्रसंगी प्रत्यक्ष मतदान अशा प्रक्रिया पार पडणार आहेत. निवडून आलेल्या सदस्यांमधूनच उपसरपंचांची निवड होणार असल्याने उपसरपंच पद ताब्यात ठेवण्याकडे राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार