
महाडमध्ये जलदुर्गांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन
महाड, ता. ७ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी किल्ले बांधण्यामागची दूरदृष्टी, जलदुर्गांचे महत्त्व, किल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास अशा अनेक गोष्टी आबालवृद्धांपर्यंत पोहचवण्याच्या हेतूने किल्ले सिंधुदुर्ग व किल्ले विजयदुर्ग या जलदुर्गांची ‘टू द स्केच’ प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची शिखर संघटना असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने तयार केलेल्या या प्रतिकृतींचे प्रदर्शन महाडमध्ये ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केले आहे.
प्रतिकृतींचे लोकार्पण १ फेब्रुवारीला मालवण येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या प्रतिकृती प्रदर्शित करण्याचा महासंघाचा मानस आहे. प्रदर्शनाचा शुभारंभ महाड येथून होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्यातील शिवाजी स्मारक मंडळाचे अध्यक्ष व सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते बुधवारी संध्याकाळी होणार आहे.
त्यानंतर गुरुवारपासून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी तर सायंकाळी ५ ते ९ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.