
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल
महाड, ता. १२ (बातमीदार) : अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या पतीविरोधात महाड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील वीर टेंभी आदिवासीवाडी येथील ही घटना आहे. याबाबत अल्पवयीन पीडित मुलीने महाड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगीही माण तालुका जिल्हा सातारा येथील मूळ रहिवासी असून ती १४ वर्षांची आहे. २०२२ मध्ये तिचा विवाह वीर टेंभी आदिवासी वाडी येथील सुरेश शंकर वाघमारे (वय २२) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि तिने ६ फेब्रुवारी २०२३ ला एका बाळाला जन्म देखील दिला; परंतु यानंतर महाड पोलिस ठाण्यामध्ये या पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश शंकर वाघमारे यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा, तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व इतर अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.