
रायगडावर शिवज्योतींचे मार्गक्रमण
महाड, ता. १९ (बातमीदार) ः जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करीत उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रायगड किल्ल्यासह महाड शहर व तालुक्यात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त रायगडाहून शिवप्रेमींनी विविध ठिकाणी शिवज्योती नेल्या. रायगडावर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नसला तरीही शासकीय अधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी पोलिसांकडून मानवंदनाही देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती जिल्ह्यात जोरदार साजरी होत असली तरी रविवारीही शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह होता. शिवप्रेमी रायगड किल्ल्यावरून आपल्या गावी शिवज्योती नेत होते. या शिवज्योतीमुळे रायगड किल्ल्याचा रस्ता तसेच मुंबई-गोवा महामार्ग भगवामय झालेला होता. अनेक दुचाकी तसेच वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. रायगडावरील मेघडंबरीची सजावट तर राजसदरेवर विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. सकाळी रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्याला शासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाड तहसीलदार सुरेश काशिद, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, पोलिस निरिक्षक मारुती आंधळे व शिवप्रेमी उपस्थित होते. पोलिसांच्या वतीने राजसदरेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मानवंदनाही देण्यात आली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पालिकेकडून रोषणाई करण्यात आली होती. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या हस्ते चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विविध सरकारी कार्यालये, शाळा तसेच गाव व वाड्यांवर शिवजयंती साजरी करण्यात आली.