
आदर्श गृहिणींना मिळणार मानाची पैठणी
महाड, ता. २२ (बातमीदार) : नगरपरिषदेने शहरातील गृहिणींना पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. १ ते १० मार्च २०२३ या कालावधीत स्वच्छ भारत व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आदर्श गृहिणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक वॉर्डमधील विजेत्या गृहिणींना मानाची पैठणी दिली जाणार आहे.
शहरामध्ये निर्माण होणारा कचरा व त्याचे विघटन मोठे डोकेदुखी बनत आहे. त्यामुळेच कचरा विघटनाबाबत प्रशासन जागृत झाली आहे. ओला कचरा, सुका कचरा विलगीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. शहर कचराकुंडी मुक्त करण्यात आले असून घंटागाडीमध्ये शहरातील सर्व कचरा एकत्रित करून लाडवली येथे प्रक्रिया देखील केली जाते. स्वच्छ भारत अभियान अधिक गतिमान करण्यासाठी नगरपालिकेने आता आदर्श गृहिणी स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये कचरा विलगीकरण, हरित सेंद्रिय खत, परसबाग, उद्यान तसेच टाकाऊ वस्तूंचा वापर या बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे. या अभियानांतर्गत उत्तम काम करणाऱ्या महिलेस मानाची पैठणी दिली जाणार आहे.
नगरपरिषदेच्या घंटागाडीत कचरा देणे, त्याचे विलगीकरण करून ओला कचरा हिरव्या डब्यात तर सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात देणे, घरातील शिळे अन्न, ओला कचरा याचे घरच्या घरी खत निर्मिती करणे, घरामध्ये बाग करून ओल्या कचऱ्यापासून निर्मित केलेले सेंद्रिय खत स्वतः वापरात आणणे तसेच घरातील टाकाऊ वस्तूंपासून टिकावू वस्तू बनवणे आदी गोष्टींचा यात समावेश आहे. असे काम करणाऱ्या महिलांना एक ते दहा मार्चच्या कालावधीत स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सहभागी झालेल्या स्पर्धक महिलांचे विविध माध्यमातून मॉनिटरिंग केले जाणार आहे. प्रत्येक प्रभागनिहाय विजेत्या ठरलेल्या महिलेला मानाची पैठणी देखील दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या फेसबुक अकाउंटवर अथवा नगरपरिषद कार्यालयामध्ये ऑनलाइन तसेच गुगलवर फॉर्म भरून नोंदणी करता येणार असल्याचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले. स्पर्धेची नोंदणी मुदत २८ फेब्रुवारी आहे.