महाडच्या प्रसोल केमिकल्सला दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडच्या प्रसोल केमिकल्सला दणका
महाडच्या प्रसोल केमिकल्सला दणका

महाडच्या प्रसोल केमिकल्सला दणका

sakal_logo
By

महाड, ता.२३ (बातमीदार): महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील प्रसोल केमिकल्स कारखान्यातील उत्पादन थांबवण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. या कारखान्यातील दुर्गंधी आणि वायू प्रदूषणाने त्रस्त झालेल्या आमशेत ग्रामस्थांनी हा कारखाना बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये देखील अशाच प्रकारे प्रसोल कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल केमिकल्स या कंपनीमुळे वायू तसेच जलप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आमशेत गावातील ग्रामस्थांनी केल्या होत्या. १४ नोव्हेंबर २०२२ ला कारखान्यात वायुगळतीने एका स्थानिक कामगाराचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी या कंपनी विरोधात तीव्र आंदोलन केले होते. तसेच आक्रमक भूमिका घेत प्रसोल केमिकल्स हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या या भूमिकेची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्याला उत्पादन थांबवण्याची नोटीस बजावली आहे. तसेच जोपर्यंत दुर्गंधी आणि वायू प्रदूषणावर उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत उत्पादन प्रक्रीया बंद ठेवावी, असे निर्देश दिले आहेत. पण या निर्देशांमुळे प्रसोल कंपनीत काम करणाऱ्या कामगार वर्गालाही याचा फटका बसणार आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
-------------------------------------
काय म्हंटलय नोटिशीत ?
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या नोटिशीमध्ये कंपनीने यंत्रणेची प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांसह आमशेत ग्रामस्थांसमोर चाचणी घेण्याचे नमुद आहे. शिवाय ही चाचणी यशस्वी झाल्याची खात्री झाल्यानंतरच उत्पादन सुरु करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या सल्ल्यानुसार सातत्याने कारखान्याच्या परिसरातील गावागावांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही दिले आहेत.
-----------------------------------
दुर्गंधी तसेच प्रदूषण रोखणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश प्रसोल कंपनीला देण्यात आले आहेत. केलेल्या उपाययोजनांची पाहणी करून पुन्हा उत्पादन सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत विचार केला जाईल.
-इंदिरा गायकवाड, उप-प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड