महाडमध्ये साहित्‍यिक उपक्रम

महाडमध्ये साहित्‍यिक उपक्रम

महाड, ता. १ (बातमीदार) : कवी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने शहरातील श्रीराम मंदिर, चवदार तळे येथे शाखेचे अध्यक्ष गंगाधर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोकण साहित्य भूषण प्रभाकर भुस्कुटे, कोमसाप केंद्रीय नियामक मंडळाच्या सदस्या शोभा सावंत, महाड शाखेचे अध्यक्ष गंगाधर साळवी, जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, अ. वि. जंगम, माजी अध्यक्षा स्नेहा गांधी उपस्थित होते. यावेळी जागतिक पातळीवर आयोजित अभिवाचन स्पर्धेत वाचिक अभिनयासाठी तृतीय क्रमांक प्राप्त मानसी मराठे यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर जॉन्सन डिसोजा यांनी, संगीत संयोजन केलेले ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या कवी सुरेश भट यांच्या गीताचे गायन प्रिया शहा, प्रतीक्षा नगरकर, पद्मा शिपूरकर, उमेश मिंडे, गंगाधर साळवी यांनी केले. सेंट झेवियर्स स्कूलच्या नीतेश पिसाळ, अथर्व कराले या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व संवादाच्या माध्यमातून सादर केले. प्रास्ताविकात अध्यक्ष गंगाधर साळवी यांनी मराठी भाषेसाठी योगदान देणाऱ्या संत, साहित्यिक व महापुरुषांची माहिती दिली. प्रभाकर भुस्कुटे यांनी मराठीतील साहित्यिक, मराठी भाषा, तिचा प्रभाव, तिचे स्थान याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
केंद्रीय नियामक मंडळाच्या सदस्या शोभा सावंत यांनी, मराठी शब्दांचा वापर कसा करावा, हे उदाहरणांसह स्पष्ट केले. लेखिका डॉ शीतल मालुसरे यांच्या १६ व्या पुस्तक प्रकाशनाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यानंतर मंगेश कंक, प्रिया शहा,संध्या पोटफोडे,किरण मोरे, मानसी मराठे,मंगेश कंक,रोशन कदम, शमा पाटील, अनुजा शेठ,प्रतीक्षा नगरकर, दीपक सकपाळ,मुग्धा सागवेकर, मयुरी कदम यांनी विविध कलाकृती सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा शिपूरकर यांनी केले तर आभार सचिव दीपक सकपाळ यांनी मानले.

महाड ः मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

................


मराठी राज्यभाषा दिनानिमित्त विविध स्‍पर्धा
ग्रंथदिंडीसह पुस्‍तक प्रदर्शनाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयात दोन दिवस मराठी राज्यभाषा दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची बुधवारी सांगता करण्यात आली. या वेळी कथा, कविता, लेखन, प्रश्‍नमंजूषा अशा विविध स्‍पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सार्वजनिक वाचनालय तथा रायगड जिल्हा ग्रंथालयातून विद्यार्थ्यांनी सोमवारी ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. ज्ञानेश्वरी व इतर ग्रंथांचे पूजन करून ग्रंथदिंडीची सुरुवात झाली. जनता शिक्षण मंडळाच्या ज्येष्ठ संचालिका तसेच सार्वजनिक वाचनालय अलिबागच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांचे हस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले.
अॅड. गौतम पाटील यांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखीचे मार्गक्रमण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित ग्रंथ दिंडीत विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. टाळ मृदुगांच्या गजराने सार्वजनिक वाचनालय ते महाविद्यालयाचे ग्रंथालय परिसर गजबजून गेला होता.
मराठी भाषा दिनानिमित्त दोन दिवस ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते. जवळपास एक हजार विद्यार्थी व वाचकांनी प्रदर्शनास भेट दिली. मंगळवारी कार्यक्रमांची सांगता ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमांतर्गत लेखक व उल्हासनगर येथील सी. एच. एम. कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. नितीन आरेकर यांचे व्याख्यान आयोजन केले आले होते. कार्यक्रमात प्रश्नमंजूषा, मराठीत बोल, कथा, कविता, निबंध इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते. विजेत्‍यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

फोटो -
-----------------

माणगावमध्ये काव्यमैफल

माणगाव (वार्ताहर) ः शहरातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात काव्यमैफल, अभिवाचन कार्यक्रम नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त उपस्थित साहित्यिक, कवींनी कविता, अभिवाचन, गझल, ओव्या सादर केल्या. मराठी भाषेचे प्राचीन काळापासूनचे स्थान आणि महत्त्व यावर रवींद्र कुवेसकर यांनी माहिती दिली.
कविसंमेलनात श्रध्दा अंबुर्ले यांनी सादर केलेल्या जात्यावरील ओव्या, संगीता नाचपल्ले यांची गझल या साहित्यिक प्रकाराला विशेष दाद मिळाली. उदयोन्मुख चित्रकार मंदार कदम यांनी रेखाटलेले कविवर्य कुसुमाग्रजांचे रेखाचित्र साहित्य रसिकांचे लक्षवेधी ठरले. आगामी काळात माणगाव शहरामध्ये भव्य स्वरूपात साहित्य संमेलन किंवा कविसंमेलनाचे आयोजन करण्याचे आश्वासन याप्रसंगी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com