
शिवप्रेमींना आसरा देणाऱ्या निवारा शेडवर हातोडा
महाड, ता. २(बातमीदार) : रायगड किल्ल्यावर येणाऱ्या शिवप्रेमींना आसरा देणाऱ्या दोन मोठ्या शेड रायगड प्राधिकरणामार्फत तोडण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी शिवप्रेमींच्या माध्यमातून कोकणकडा मित्र मंडळाने केली आहे. याबाबत कोकणकडाने रायगड प्राधिकरणाचे उप अभियंत्यांची भेट घेत निवेदनही दिले आहे.
रायगड किल्ल्यावर जिल्हा परिषदेच्या मालकीची दहा गुंठे जागा असून या जागेवर दोन निवारा शेड आहेत. चाळीस-पन्नास वर्षे रायगडावर चालत येणाऱ्या शिवप्रेमींना या शेडचा मोठा आसरा असतो. सहलीला येणारी मुले याठिकाणी वास्तव्य करतात. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. निवारा शेडची देखभाल-दुरुस्ती जिल्हा परिषदेकडून होते.
रायगडावर साजरे होणारे शिवराज्याभिषेक दिन सोहळा, शिव पुण्यतिथी तसेच इतर अनेक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या शिवप्रेमींना शेडच एकमेव आश्रय आहेत. परंतु आता गडावर होत असलेल्या विकासकामांमध्ये निवारा शेड तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या येथील फरशा काढण्यात आल्या आहेत. निवारा शेडच्या पायथ्याशी काही वाड्यांचे अवशेष असावे, या उद्देशाने पुरातत्त्व विभागाकडून शेड तोडण्यात याव्यात असे सुचविण्यात आलेले आहे. परंतु हे सर्व करत असताना सर्वसामान्य शिवप्रेमींची होणारी गैरसोय विचारात घेतली न गेल्याने महाडच्या कोकणकडा मित्र मंडळाने आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे.
गडावर शिवप्रेमींसाठी सध्या कोणतीही निवारा व्यवस्था नाही. शिवराज्याभिषेक व शिवपुण्यतिथीचे कार्यक्रम तोंडावर आले आहेत. त्यामुळे निवारा शेड तोडण्याचे काम तातडीने थांबवावे. शेडच्या मागील बाजूस मंजूर केलेल्या नवीन निवारा शेड बांधल्या जाव्यात, रायगडावर पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहाची सोय केली जावी. रायगड प्राधिकरणाकडून होणाऱ्या कामांमध्ये स्थानिकांना विश्वासात घेतले जावे व त्यांची मतेही विचारात घेतली जावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, अनिकेत कदम, महेश मोरे, सिद्धेश मोरे व नीलेश तळवटकर यांनी याबाबत रायगडचे प्राधिकरणाचे उपअभियंता संजय शिंदे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले आहे. पुरातत्त्व विभाग, रायगड जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.
याबाबत उपअभियंता संजय शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
रायगडावरील निवारा शेड अनेक वर्षांपासून शिवप्रेमींसाठी उपयुक्त ठरत आहे. शेड तोडण्याचे काम त्वरित थांबवावे अन्यथा शिवप्रेमींना आंदोलन करावे लागेल.
- सुरेश पवार, अध्यक्ष, कोकण कडा मित्र मंडळ
महाड ः रायगडावरील निवारा शेड तोडण्यात येत आहे.